धनगरवाडा जमिनीबाबत १५ दिवसांत सर्वेक्षण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:32 AM2021-09-07T04:32:26+5:302021-09-07T04:32:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : वनविभागाने धनगरवाडा व विनोबा ग्राममधील जमीन येथील शेतकऱ्यांना दिली असताना पुन्हा वनविभागाच्या नावे ही ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : वनविभागाने धनगरवाडा व विनोबा ग्राममधील जमीन येथील शेतकऱ्यांना दिली असताना पुन्हा वनविभागाच्या नावे ही जमीन कशी नोंद झाली. याबाबत वन्यजीव विभागाने १५ दिवसांत सर्वेक्षण करावे. तसेच सातारा येथून आठ दिवसांत याबाबत कागदपत्रे आल्यानंतर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा बैठक घेऊन, असे आश्वासन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिले.
येथील तहसीलदार कार्यालयात धनगरवडा व विनोबाग्राम येथील शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत वन व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते.
यावेळी आमदार मानसिंगराव नाईक, प्रांताधिकारी संपत खिलारे, प्रांताधिकारी ओंकार देशमुख, उपवनसंरक्षक विजय माने, तहसीलदार गणेश शिंदे, सहाय्यक उपवनसंरक्षक पी. आर. गावडे, सम्राटसिंह नाईक, विराज नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.
जलसंपदा मंत्री पाटील म्हणाले की वनविभागाचे नाव ७/१२ वरून कमी करण्यासाठी तातडीने प्रस्ताव तयार करून नागपूर व दिल्ली येथून प्रस्ताव मंजूर करण्यासाठी पाठवा. यासाठी आपण स्वतः व आमदार मानसिंगराव नाईक जातीने लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावणार.
आमदार नाईक यांनी, नोंदीबाबत वन व महसूल विभागात वाद आहे. त्यात नागरिकांना कशाला अडचणीत आणता. ३० वर्षे झाले विनाकारण त्रास देण्यासाठी हे करत आहात. त्यांच्याच जमिनीसाठी तुम्ही त्यांनाच रडवता, अशा शब्दांत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
यावेळी नगराध्यक्षा सुनीता निकम, उपसभापती बी. के. नायकवडी, विजयराव नलवडे, विश्वास कदम, वनक्षेत्रपाल सुशांत काळे, सुरेश चिल्लावार, वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे, महादेव कदम, अरविंद माने, सरपंच वसंत पाटील तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.