फलटण-सांगली मार्गाचे सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 06:11 PM2019-10-14T18:11:49+5:302019-10-14T18:12:21+5:30
फलटण ते मिरज या नव्या लोहमार्गाचे सर्वेक्षण रेल्वे बोर्डाने सुरू केले आहे. हा मार्ग दहीवडी-विटा-तासगाव व सांगली असा प्रस्तावित आहे. प्राथमिक सर्वेक्षणासाठी ३७ लाखांची तरतूद केली आहे. सर्वेक्षणातून प्रवासी भारमान आणि अभियांत्रिकी कामाच्या खर्चाचा अंदाज घेतला जाईल.
सांगली : फलटण ते मिरज या नव्या लोहमार्गाचे सर्वेक्षण रेल्वे बोर्डाने सुरू केले आहे. हा मार्ग दहीवडी-विटा-तासगाव व सांगली असा प्रस्तावित आहे. प्राथमिक सर्वेक्षणासाठी ३७ लाखांची तरतूद केली आहे. सर्वेक्षणातून प्रवासी भारमान आणि अभियांत्रिकी कामाच्या खर्चाचा अंदाज घेतला जाईल.
यानिमित्ताने जिल्ह्यात आणखी एक लोहमार्ग उपलब्ध होणार आहे. सध्या मिरजेतून पुणे, बेळगाव, पंढरपूर व कोल्हापूर असे चार लोहमार्ग जातात. नव्या लोहमार्गामुळे विटा-तासगाव हा भाग रेल्वेच्या जाळ्यात येईल. या भागातील प्रवाशांना पुणे-मुंबईसह विदर्भ-मराठवाडा व कर्नाटकात जाण्यासाठी थेट रेल्वे उपलब्ध होणार आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पात सर्वेक्षणासाठी तरतूद करण्यात आली होती, त्यानुसार प्रत्यक्ष कार्यवाही सुरु झाली आहे. फलटण-मिरज हा प्रस्तावित लोहमार्ग १५० किलोमीटर लांबीचा आहे. तो सांगलीत मुख्य मार्गाला जोडला जाईल.
यानिमित्ताने सांगलीदेखील जंक्शन म्हणून पुढे येईल. नव्या मार्गासाठी संपादित करावी लागणारी बहुतांश जमीन माळरान स्वरुपाची असल्याने हा मार्ग कमी खर्चात होईल. भूसंपादनासाठी शेतकऱ्यांचा विरोधही फारसा होणार नाही, अशी अपेक्षा आहे.
रेल्वेच्या सर्वेक्षणात प्रवासी भारमान अत्यंत महत्त्वाचे ठरते. या मार्गावरुन पुरेसा प्रवासी वर्ग मिळण्याची हमी असेल, तर मंजुरीचा विचार रेल्वे मंडळाकडून होईल. तसेच मालवाहतुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचाही अंदाज घेतला जाईल.