सांगलीत मालमत्तांचे सर्वेक्षण सुरू
By admin | Published: April 25, 2016 11:18 PM2016-04-25T23:18:51+5:302016-04-26T00:24:53+5:30
महापालिकेची कार्यवाही : दोनशे कर्मचाऱ्यांचे पथक नियुक्त
सांगली : महापालिकेने शहरातील मालमत्तांच्या सर्वेक्षणाची मोहीम सोमवारपासून हाती घेतली. सुमारे दोनशे कर्मचाऱ्यांच्या पथकाकडून घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यात सांगली शहरातील २५ भागात ही मोहीम राबविली जात आहे.
दोन आठवड्यापूर्वी महापौर हारूण शिकलगार, स्थायी समिती सभापती संतोष पाटील, गटनेते किशोर जामदार, आयुक्त अजिज कारचे यांच्यासह नगरसेवकांची बैठक झाली होती. या बैठकीत पालिकेच्या विविध करांचा आढावा घेण्यात आला. महापौर शिकलगार व गटनेते जामदार यांनी मालमत्तांच्या सर्वेक्षणाचा मुद्दा उपस्थित केला होता. शहरातील उपनगरांत मोठ्या प्रमाणात बांधकामे झाली आहेत. पण त्यांची महापालिकेकडे नोंदच नाही. गावठाणातही अनेकांनी वाढीव बांधकाम केले आहे. पण त्यांना जुन्याच दराने घरपट्टी आकारली जात आहे. घरपट्टी विभागातील कर्मचाऱ्यांच्या साखळीमुळे महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न बुडत आहे. नव्याने सर्वेक्षण केल्यास ३० हजारहून अधिक मालमत्ता रेकॉर्डवर येतील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला होता.
त्यानुसार गेले पंधरा दिवस घरपट्टी विभागाकडून नियोजन केले जात होते. या सर्वेक्षणासाठी २१९ जणांची नियुक्ती करण्यात आली. या कर्मचाऱ्यांना दोन दिवसात आदेश देण्यात आले. सोमवारपासून प्रत्यक्षात सर्वेक्षणाला सुरूवात झाली. पहिल्या टप्प्यात सांगली शहरातील ५६ भागांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सोमवारी एकूण २५ भागात ही मोहीम हाती घेतली. या कर्मचाऱ्यांवर देखरेख ठेवण्यासाठी चार सहायक आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. दररोज किमान शंभर ते दीडशे घरांचा सर्व्हे केला जाणार आहे. यात बांधकाम परवाना, गुंठेवारी प्रमाणपत्र आहे का?, परवान्यापेक्षा जादा बांधकाम, घरपट्टी, पाणीपट्टी, स्वच्छतागृहाचा सर्व्हे होणार आहे. सोमवारी सकाळी स्थायी समिती सभापती संतोष पाटील यांनी मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)