सहा हजार शिक्षकांकडून सर्वेक्षण
By admin | Published: July 5, 2015 01:16 AM2015-07-05T01:16:48+5:302015-07-05T01:19:45+5:30
शाळाबाह्य मुले : सोमवारी अहवाल देणार
सांगली : जिल्ह्यात शनिवारी शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. यासाठी जिल्हा परिषदेकडून ४ हजार ८८३ शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. त्याचबरोबर महापालिका क्षेत्रामध्ये १ हजार ८८५ शिक्षकांंची नियुक्ती करण्यात आली होती. एकूण जिल्ह्यामध्ये ६ हजार ६८ शिक्षकांकडून शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत सर्वेक्षण सुरू होते. याचा अहवाल प्रशासनाला शनिवारी प्राप्त होणार असून, सोमवारी हा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात येईल, अशी माहिती शिक्षणाधिकारी नीशादेवी वाघमोडे यांनी दिली.
शासनाच्या आदेशानुसार शनिवारी दिवसभर जिल्हा व महापालिका क्षेत्रामध्ये शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. यासाठी पालिकाक्षेत्रात १ हजार १८५ शिक्षक नियुक्त करण्यात आले होते. सर्वेक्षण सुरळीत पार पाडल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली. शिक्षक सर्वेक्षणाच्या कामात गुंतल्याने अनेक शाळांना सुट्टी देण्यात आली. सर्वेक्षणाचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सोमवारी सादर करण्यात येईल, अशी माहिती शिक्षण विभागाचे अधिकारी जे. आर. गायकवाड यांनी दिली.
सकाळी सात वाजता सर्वेक्षणास प्रारंभ करण्यात आला. प्रशासकीय अधिकारी ए. बी. वाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. सर्वेक्षणासाठी ४० झोनल अधिकारी, तीन नियंत्रण अधिकारी व शिक्षक नियुक्त करण्यात आले होते. (प्रतिनिधी)