जयंती-पुण्यतिथी बनतायेत जगण्याचा उद्योग
By admin | Published: March 28, 2016 11:47 PM2016-03-28T23:47:02+5:302016-03-29T00:08:12+5:30
वर्गणीसाठी तगादा : आटपाडीत अधिकारी, व्यापाऱ्यांना नाहक त्रास
आटपाडी : अलीकडे कोणत्याही महापुरुषाची जयंती जवळ आली की, व्यापारी आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या अंगावर काटा उभा रहात आहे. कार्यकर्त्यांच्या ‘टोळ्या’(?) करून वर्गणी गोळा करायची आणि एक मिरवणूक, थोडीफार रोेषणाई करून वर्गणीवर डल्ला मारायचा, असा अनेकांचा फंडा झाला आहे. काहीजणांचा तर वर्षभर जगण्याचा उद्योगच झाला आहे.
सदैव दुष्काळाच्या छायेत असणाऱ्या आटपाडीत महापुरुषांच्या जयंत्या मात्र अलीकडे मोठ्या उत्साहात ‘संपन्न’ होताना दिसत आहेत. महापुरुषांच्या विचारांऐवजी त्यांचा उत्सव साजरा करण्यामध्ये अनेक मंडळींना अधिक रस वाटतोय. जयंती उत्सवाच्या नावाखाली वर्गणीची पावती पुस्तके छापून टोळकी-टोळकी एकत्र येऊन दंडेलशाहीने वर्गणी गोळा करतात. अनेक शासकीय कार्यालयांमध्ये जाऊन मनमानी रक्कम पावतीवर लिहून पावती फाडून ती अधिकाऱ्यांकडे देतात. वर्गणी द्या नाही तर तुमच्या कार्यालयाविरुद्ध आंदोलन करण्याचा दमही काहीवेळा दिला जात असल्याच्या तक्रारी आहेत.
एवढी वर्गणी जमा करून ही मंडळी त्याचे काय करणार आहेत, याबाबत कुणाला विचारायची सोय नसते. या पैशाचं ते काय करतात ते ही कळायला मार्ग नाही. केवळ मिरवणूक, एखादा कार्यक्रम, मिरवणुकीत डीजेच्या तालावर नाचणारे काही तरुण एवढ्या उत्सवासाठी मोठ्या वर्गणीची गरज का लागते, हे आटपाडीकरांना न सुटलेले कोडे आहे. उत्सव साजरा करणाऱ्या किती मंडळांनी धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केलेली आहे, हा चौकशीचाच भाग आहे. या सगळ्या खाबूगिरीत दुष्काळी परिस्थितीमुळे व्यापाऱ्यांवर परिणाम झाल्याने आर्थिक संकटात सापडलेले व्यापारी आणि प्रामाणिक अधिकारी यांचे मात्र हाल होत आहेत. (वार्ताहर)
वर्गणी नव्हे, खंडणी..!
गणेशोत्सवात सर्व मंडळांना पोलिस परवानगी देतानाच सक्तीने वर्गणी घेतली, तर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारावजा सूचना देतात. अलीकडे महापुरुषांच्या जयंती उत्सव साजरा करणाऱ्या मंडळींबाबतही पोलिसांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. महापुरुषांची जयंती साजरी करणारी मंडळे अधिकृत आहेत काय? ते वर्गणीच्या खर्चाच्या तपशिलांचे आॅडिट करून घेतात काय? यासह सर्व कायदेशीर बाबींची सक्त तपासणी होणे गरजेचे आहे.