तुंग येथे अल्पवयीन मुलीचा खून केल्याप्रकरणी संशयित दोषी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:28 AM2021-05-06T04:28:52+5:302021-05-06T04:28:52+5:30
खटल्याची हकीकत अशी की, तुंगजवळील एका भागातील अल्पवयीन मुलगी २० मे २०२० रोजी सायंकाळी सातपासून बेपत्ता झाली होती. ती ...
खटल्याची हकीकत अशी की, तुंगजवळील एका भागातील अल्पवयीन मुलगी २० मे २०२० रोजी सायंकाळी सातपासून बेपत्ता झाली होती. ती कुठेेच सापडत नसल्याने कुटुंबीय व इतरांनी तिचा शोध सुरू केला होता. रात्रभर शोध घेऊनही ती सापडली नव्हती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा तिचा शोध सुरू करण्यात आला होता. यावेळी हाळभाग परिसरात एका शेतात तिचे प्रेत सापडले होते. यावेळी तिच्या डोक्यात जखमा होत्या तर तिचा पायजमा गळ्याभोवती गुंडाळलेला होता.
सांगली ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला होता. त्यात संशयित अल्पवयीन हा मृत मुलीसोबत खेळत असल्याचे साक्षीदारांनी पाहिले होते.
पोलिसांनी संशयितास ताब्यात घेत चौकशी केली असता, त्याने पीडित मुलीस उसाच्या शेतात नेऊन मोबाईलवर तिला अश्लील चित्रफीत दाखवून तिच्यावर बलात्कार केला. बलात्कारानंतर मुलगी रडू लागल्याने तिला खाली पाडून संशयिताने हाताने तिचा गळा आवळला. त्यानंतरही तिची हालचाल होत असल्याचे आराेपीच्या लक्षात आल्याने त्याने तिचा पायजमा काढून तिच्या गळ्याभोवती तो आवळून तिच्या मानेवर पाय ठेवून त्याने तो जाेरात आवळला होता. यातून तिची हालचाल बंद झाल्याची खात्री पटल्यानंतर तो पळून गेला होता.
जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक १ डी. पी. सातवळेकर यांच्या न्यायालयात या केसची सुनावणी सुरू आहे. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अरविंद देशमुख काम पाहत आहेत. सरकार पक्षातर्फे चौदा साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयाने आरोपीस दोषी ठरविल्यानंतर आता गुरुवारी शिक्षेबाबत युक्तिवाद होणार आहे.