गर्भवती महिलेवर अत्याचार करुन संशयित फरार, सांगली जिल्ह्यातील संतापजनक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 05:59 PM2023-02-24T17:59:38+5:302023-02-24T18:07:42+5:30
पीडित महिलेस तिच्या पतीला दोघांचे एकत्रित फोटो दाखविण्याची भीती घालत तिच्याकडून २५ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठीसुद्धा उकळली
इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या विवाहित गर्भवती महिलेवर बलात्कार करून फरारी झालेल्या संशयित युवकास अटक करावी अन्यथा माजी नगरसेवक विक्रम पाटील यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा संतप्त कार्यकर्त्यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार प्रदीप उबाळे यांना देण्यात आले आहे.
राहुल तारासिंग चव्हाण (रा.सोलापूर) असे या संशयिताचे नाव आहे.२० फेब्रुवारीला पीडित महिलेने त्याच्याविरुद्ध पोलिसात फिर्याद दिली आहे. या संशयिताने अत्याचार केल्यानंतर पीडित महिलेस तिच्या पतीला दोघांचे एकत्रित फोटो दाखविण्याची भीती घालत तिच्याकडून २५ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठीसुद्धा उकळली आहे. हा प्रकार गेल्या दीड महिन्यापासून सुरू होता. त्याच्याविरुद्ध विनयभंग, बलात्कार आणि खंडणीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पीडित महिला ही पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यास आल्यावर एका पोलीस अधिकाऱ्याने तुम्ही मौज-मजा केली आहे.आता तुम्हीच संशयिताला पकडून आणा अशी मुक्ताफळे उधळल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या घटनेतील संशयितास पोलिसांनी अटक न केल्यास २७ फेब्रुवारीला रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे. अर्जुन पाटील, निवास पाटील, श्रेया जाधव, धनश्री चव्हाण, स्वाती माने, नीलिमा हुलके, पूनम पाटील, भूषण पवार, स्वप्नील कांबळे, हसीब अत्तार यांनी हे निवेदन दिले आहे. निवेदनाच्या प्रती पोलिस उपअधीक्षक आणि पोलिस निरीक्षक यांना देण्यात आल्या आहेत.