संतोष कदमच्या खुनातील संशयितास कागलमध्ये अटक...
By घनशाम नवाथे | Published: June 12, 2024 09:28 PM2024-06-12T21:28:48+5:302024-06-12T21:29:35+5:30
अखेर सांगलीच्या गुन्हे अन्वेषण विभागानेच पकडले
सांगली: माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष कदम याच्या खुनात कुरूंदवाड पोलिसांना गेली चार महिने चकवा देणाऱ्या सिद्धार्थ ऊर्फ बाबा सुखदेव चिपरीकर (वय ३२, रा. शिवभारत चौक, सांगलीवाडी) याला सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने कागल (जि. कोल्हापूर) येथे अटक केली.
अधिक माहिती अशी, सांगलीतील माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष कदम (रा. गावभाग) याने महापालिकेतील तसेच इतर विभागातील गैरकारभार चव्हाट्यावर आणले. काही प्रकरणातील अधिकाऱ्यांवर कारवाई करावी यासाठी तो दि. ७ फेब्रुवारी २०२४ रोजी महापालिकेवर मोर्चा काढणार होता. तत्पूर्वी दि. ६ फेब्रुवारीला तो सांगलीतून तिघांबरोबर मोटारीने कुरूंदवाडला गेला होता. त्यानंतर तो परतला नाही. पत्नीने दि. ७ रोजी सकाळी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्याच दिवशी दुपारी कुरूंदवाड येथे मोटारीत त्याचा खून झाल्याचा प्रकार उघडकीस आला.
कुरूंदवाड पोलिसांनी त्याच्या मोटारीतून गेलेल्या नितेश दिलीप वराळे, सूरज प्रकाश जाधव, तुषार भिसे या सांगलीतील तिघांना अटक केली. त्यांनी आर्थिक देवघेवीतून खून केल्याचे सांगितले. तिघांच्या चौकशीतून संशयित सिद्धार्थ चिपरीकर व शाहरूख शेख यांची नावे निष्पन्न झाली. ते फरारी झाले होते.
दरम्यान कुरूंदवाड पोलिस ठाण्यातील अधिकारी रविराज फडणीस यांच्यावर मृत संतोषच्या नातेवाईकांनी तपासाबाबत संशय व्यक्त केला होता.
त्यामुळे इचलकरंजीचे उपअधीक्षक समीर साळवे यांच्याकडे तपास सोपवला होता. त्यांनी फरारी दोघांचा शोध घेण्यात अपयश आले. विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषणला फरारी दोघांचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या. पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी सहायक निरीक्षक पंकज पवार व पथकास सूचना दिल्या होत्या. या पथकातील हवालदार दीपक गायकवाड यांनी सिद्धार्थ चिपरीकर हा कागल येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने कागल पोलिस ठाणे गाठले. कागल पोलिसांच्या मदतीने सापळा रचून सिद्धार्थला पकडले. त्यानंतर उपअधीक्षक साळवे यांच्या ताब्यात त्याला दिले. तेथून त्याला कुरूंदवाड येथील न्यायालयात हजर केले असता १८ जूनपर्यंत पोलिस कोठडी दिली.
सहायक निरीक्षक पवार, उपनिरीक्षक कुमार पाटील, कर्मचारी दीपक गायकवाड, बिरोबा नरळे, संदीप गुरव, दरिबा बंडगर, अरूण पाटील, संदीप नलावडे, विनायक सुतार यांच्या पथकाने कारवाई केली.
शाहरूखचा शोध-
खून प्रकरणात शाहरूख शेख हा देखील चार महिन्यापासून फरारी आहे. त्याचाही शोध सुरू आहे. या खुनातील माजी नगरसेवकावर संशय व्यक्त करण्यात आला होता. परंतू पुरावा नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
चिपरीकर रेकॉर्डवरील गुन्हेगार-
सिद्धार्थ चिपरीकर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. यापूर्वी गाजलेल्या मिणच्या गवळी खून प्रकरणात तो संशयित होता. खंडणीचाही त्याच्यावर गुन्हा आहे. दुसऱ्यांदा तो खुनात संशयित म्हणून अटकेत आहे.