कानपुरात सोने चोरी करुन पळालेल्या संशयितास इस्लामपुरात घेतले ताब्यात, ४९ लाखांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 12:08 PM2023-12-18T12:08:00+5:302023-12-18T12:08:17+5:30
इस्लामपूर : उत्तर प्रदेश राज्यातील कानपूर येथून सोन्या-चांदीचे दागिने चोरून फरार झालेल्या एका संशयितास कानपूर पोलिसांच्या पथकाने इस्लामपूर बसस्थानकावर ...
इस्लामपूर : उत्तर प्रदेश राज्यातील कानपूर येथून सोन्या-चांदीचे दागिने चोरून फरार झालेल्या एका संशयितास कानपूर पोलिसांच्या पथकाने इस्लामपूर बसस्थानकावर जेरबंद केले. त्याच्याकडून सोने-चांदी, टंच काढण्याची मशीन व इतर साहित्य असा ४९ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
महेश विलास मस्के (रा. नागराळे, ता. पलूस) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याचे इतर साथीदार फरार आहेत. बजारिया पोलिस ठाणे हद्दीत महेश मस्के व त्याच्या साथीदारांनी अय्युब युसूफ यांच्या परिवारातील सोने व चांदी विक्री करण्याचे निश्चित केले. १ डिसेंबरला तेथील सराफी व्यापारी संपतराव लवटे यांचेकडून शुद्ध सोने-चांदी काढून त्याची बाजारामध्ये विक्री करून येणारी रक्कम देण्याचे आमिष दाखवत मस्के व त्याच्या टोळीने १५ तोळे सोने व १५ किलो चांदी घेतली होती.
त्यानंतर या टोळीने अय्युब युसूफ यांना दागिन्याचे पैसे न देता त्यांची फसवणूक केली होती. या टोळीविरुद्ध कानपूरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर हे सर्वजण पसार झाले होते.
उत्तर प्रदेश येथील पोलिस उपनिरीक्षक कमलेश पटेल हे आपल्या पथकासह संशयितांचा माग काढत इस्लामपूर येथे आले होते. सांगली जिल्हा पोलिसप्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली इस्लामपूर पोलिसांची मदत घेत या पथकाने मस्के हा इस्लामपूर बसस्थानकावर आल्याची माहिती मिळताच तेथे त्याला सापळा रचून ताब्यात घेतले.
उत्तर प्रदेश पोलिसांनी महेश मस्के याच्याकडून १२ लाखांची १५ किलो १०० ग्रॅम वजनाची चांदीचे लगड, ६ लाख रुपये किमतीचे १६ तोळे वजनाचे सोन्याचे लगड, ३० लाख रुपये किमतीची टंच काढण्याची मशीन, संगणक व इतर साहित्य असा ४९ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.