हुश् ऽऽ, आफ्रिकेतून सांगलीत आलेला संशयित निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2021 04:36 PM2021-12-09T16:36:37+5:302021-12-09T16:39:00+5:30
आफ्रिकन देशातून जिल्ह्यात आलेल्या एकाची प्रकृती खालावल्याने त्याला उपचारासाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सांगली : आफ्रिकन देशातून जिल्ह्यात आलेल्या एकाची प्रकृती खालावल्याने त्याला उपचारासाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. संजय साळुंखे यांनी सांगितले. दरम्यान, या संशयिताच्या संपर्कातील सहा जणांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.
ओमायक्राॅनच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने परदेशातून आलेल्या व्यक्तींचा शोध सुरू केला होता. संबंधित व्यक्ती पत्नी व दोन मुलासह आठवडाभरापूर्वी जत तालुक्यातील एका गावात आला. दोन दिवसानंतर त्याला त्रास होऊ लागला. जतमधील एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर नातेवाईकांनी त्याला मिरजेतील खासगी रुग्णालयात दाखल केले. बुधवारी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात त्याला हलविण्यात आले.
ही व्यक्ती आफ्रिकेतून आल्याचे समजताच जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले. त्याची माहिती गोळा करण्याचे काम सुरू झाले. आरोग्य विभागाच्या पथकाने त्याच्या घरी जाऊन माहिती घेतली. पत्नी, दोन मुले व त्यांच्या संपर्कातील दोन नातेवाईकांचे नमुनेही तपासणीसाठी घेण्यात आले. दरम्यान, संशयित रुग्णाचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. पण त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे प्रशासनाने सांगितले.
दक्षिण की पूर्व आफ्रिका?
संबंधित व्यक्ती नोकरीच्या निमित्ताने काही वर्षापासून आफ्रिकेत आहे. पण तो दक्षिण आफ्रिकेत आहे की पूर्व आफ्रिकेत, याची माहिती प्रशासनाला मिळू शकलेली नाही. विदेशातून आलेल्या व्यक्तींच्या यादीतही त्यांचे नाव नव्हते. ही व्यक्ती नैरोबी (केनिया) येथून आल्याचे सांगितले जात आहे. पण याबाबत प्रशासनाकडून खात्री करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.