वहिनीवर गोळीबार करून फरारी असलेल्या संशयितास इस्लामपूर बस स्थानकावर अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 12:05 PM2017-11-02T12:05:04+5:302017-11-02T12:15:29+5:30
घरगुती वादातून वहिनीवर गोळीबार करून गेल्या वर्षभरापासून फरारी असलेल्या शशिकांत ऊर्फ आबा मारुती हुबाळे (रा. वाळवा) या संशयिताला गुंडाविरोधी पोलिस पथकाने बुधवारी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल व जिवंत काडतूस असा ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सांगली ,दि. ०२ : घरगुती वादातून वहिनीवर गोळीबार करून गेल्या वर्षभरापासून फरारी असलेल्या शशिकांत ऊर्फ आबा मारुती हुबाळे (रा. वाळवा) या संशयिताला गुंडाविरोधी पोलिस पथकाने बुधवारी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल व जिवंत काडतूस असा ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे व अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी अवैध शस्त्रे, अंमली पदार्थ विक्री व फरारी संशयितांचा शोध घेण्याचे आदेश गुंडाविरोधी पथकाला दिले होते.
पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष डोके यांच्या पथकाला, वर्षभरापासून फरारी असलेला शशिकांत हुबाळे इस्लामपूर बसस्थानकावर येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने हुबाळे याला इस्लामपूर बस स्थानकावर सापळा रचून अटक केली. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत काडतुस मिळाले.
हुबाळे हा वर्षभरापासून फरार होता. त्याने २४ जुलै २०१६ रोजी वहिनी सुषमा सुनील हुबाळे यांच्यावर गोळीबार करून त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला होता. ही घटना घरगुती वादातून सुषमा यांच्या माहेरी पलूस येथे घडली होती. या हल्ल्यात सुषमा यांच्या पायाला गोळी लागून त्या गंभीर जखमी झाल्या होत्या.
शशिकांत याला मदत करणाऱ्या दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली होती, पण तो फरार झाला होता. वर्षभरापासून पोलिस त्याचा शोध घेत होते. अखेर तो इस्लामपूर बस स्थानकावर जेरबंद झाला. त्याला पुढील तपासासाठी पलूस पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले.
या कारवाईत पोलिस कॉन्स्टेबल शंकर पाटील, महेश आवळे, मेघराज रुपनर, सचिन कुंभार, योगेश खराडे, सागर लवटे, वैभव पाटील, संकेत कानडे, आर्यन देशिंगकर, सुप्रिया साळुंखे, किरण खोत यांनी भाग घेतला.