मिरजेच्या पंचायत समितीमध्ये निलंबित अधिकाऱ्याचा राबता
By admin | Published: July 25, 2016 10:54 PM2016-07-25T22:54:06+5:302016-07-25T23:07:56+5:30
पुनर्स्थापनेविरोधात ठराव : पदाधिकाऱ्यांनी दिला धक्का
मिरज : निलंबनाची कारवाई होऊनही मिरज पंचायत समितीच्या कार्यालयात राबता असणाऱ्या अधिकाऱ्यास पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दे-धक्का दिल्याने त्याची पंचाईत झाली आहे. निलंबित अधिकाऱ्याची मिरज पंचायत समिती कार्यालयाकडे पुनर्स्थापना करु नये, असा ठराव करण्यात आला आहे. असे असले तरी, या ठरावामुळे तरी संबंधित अधिकाऱ्याच्या कार्यालयातील वावरास ब्रेक लागणार का? असा सवाल इतर त्रस्त कर्मचारी व अधिकारी करीत आहेत.
मिरज पंचायत समितीमधील एक अधिकारी दुसऱ्या तालुक्यातील एका प्रकरणावरुन निलंबित आहे. मात्र निलंबनापासूनही त्याचा मिरज पंचायत समितीच्या संबंधित विभागात वावर सुरूच आहे. निलंबित असताना संबंधित विभागात त्या अधिकाऱ्याच्या येण्याबद्दल पंचायत समितीत उलटसुलट चर्चा आहे. या अधिकाऱ्याचे विभागात येणे, कार्यालयातील साहित्याचा वापर करणे, कर्मचाऱ्यांशी गप्पा मारणे याचा त्रास सहन करावा लागत असल्याने, विभागातील काही अधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे तक्रारही केल्याची चर्चा आहे. मात्र वरिष्ठांनी, हा अधिकारी निलंबित असताना संबंधित कार्यालयात का येतो, याचा साधा जाबही विचारला नसल्याने, त्या निलंबित अधिकाऱ्याचा कार्यालयात राबता सुरुच होता.
निलंबनाच्या कारवाईचा निकाल लागल्यानंतर, आपली मिरज पंचायत कार्यालयातच नेमणूक होणार असल्याची दबावाची भाषाही तो सहकाऱ्यांकडे बोलून दाखवत होता. अखेर ही तक्रार पंचायत समितीच्या सदस्यांपर्यंत पोहोचल्याने, सदस्यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन खात्री केली असता, संबंधित अधिकारी कार्यालयात वारंवार येत असल्याचे व गप्पा मारुन कामकाजात व्यत्यय आणत असल्याचे निदर्शनास आल्याने, त्यांनी हा विषय गांभीर्याने घेतला.
पदाधिकाऱ्यांनी मासिक सभेत निलंबित अधिकाऱ्याची पंचायत समितीकडे पुनर्स्थापना करु नये, असा ठरावच घेतला आहे. (वार्ताहर)
ठरावावेळीही अधिकारी हजर!
पंचायत समितीच्या तहकूब मासिक सभेत सदस्य सतीश निळकंठ यांनी, या निलंबित अधिकाऱ्याची पंचायत समितीकडे पुन्हा पुनर्स्थापना करण्यात येऊ नये, असा ठराव मांडला. या ठरावाला सर्वच सदस्यांनी अनुमोदन दिले. सभागृहात ठराव होत असतानाही संबंधित अधिकारी पंचायत समितीच्या आवारात हजर होता. विरोधात ठराव झाल्याची माहिती मिळताच या अधिकाऱ्याचा चेहरा पडलेला दिसून आला.