पाच पोलिसांचे निलंबन मागे घ्यावे - संभाजी भिडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 06:27 AM2018-04-29T06:27:01+5:302018-04-29T06:27:01+5:30
कर्तव्यात कसूर करणाऱ्या पाच पोलिसांचे निलंबन मागे घ्यावे, अशी विनंती शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांना केली आहे
सांगली : कर्तव्यात कसूर करणाऱ्या पाच पोलिसांचे निलंबन मागे घ्यावे, अशी विनंती शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांना केली आहे. या पोलिसांचा काही दोष नाही, असेही भिडे यांनी सांगितले.
गेल्या काही वर्षांपासून भिडे यांना दोन पोलिसांचे संरक्षण होते. कोरेगाव-भीमा घटनेनंतर त्यांच्या संरक्षणात वाढ करण्यात आली आहे. दिवस आणि रात्र अशा दोन सत्रात त्यांच्या सुरक्षेसाठी दहा पोलीस तैनात केले आहेत. २० एप्रिलला भिडे हे पहाटे साडेपाच वाजता एसटी बसने कामानिमित्त पुण्याला गेले होते. ही बाब रात्री कर्तव्यावर त्यांच्या संरक्षणासाठी असलेले पोलीस हवालदार ए. के. कोळेकर, टी. बी. कुंभार, एस. ए. पाटील, व्ही. एस. पाटणकर व ए. एस. शेटे यांना समजली नाही. सकाळ सत्रातील सुरक्षेचे पाच पोलीस आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता.
त्यानंतर या पाचही पोलिसांना शर्मा यांनी शुक्रवारी निलंबित केले. या कारवाईचे वृत्त समजताच भिडे यांनी तातडीने शर्मा यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला. ‘साहेब, आपण निलंबित केलेल्या पाच पोलिसांचा काहीच दोष नाही. त्यांचे निलंबन मागे घ्यावे’, अशी विनंती केली. तसेच ‘मला सुरक्षेची काही गरज नाही. मी कुठेही फिरत असतो, विनाकारण तुमच्या लोकांचे हाल होतात. माझ्या संरक्षणासाठी दिलेले हे पोलीस अन्य कामासाठी घ्यावेत’, असेही सांगितले. यावर शर्मा यांनी ‘ही खात्यांतर्गत बाब आहे. आमच्या लोकांची चूक असल्यानेच त्यांच्यावर कारवाई केली आहे’, असे त्यांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.