विट्यातील दुय्यम निबंधक निलंबित
By admin | Published: December 4, 2014 11:28 PM2014-12-04T23:28:46+5:302014-12-04T23:41:01+5:30
बेकायदेशीर नोंदणी : जगतापांना दणका
विटा : विटा येथील जागेच्या दस्ताची बेकायदेशीर नोंदणी केल्याचा ठपका ठेवत विटा येथील मुद्रांक व नोंदणी कार्यालयातील श्रेणी १ चे दुय्यम निबंधक अनिल ज्ञानदेव जगताप यांना पुणे येथील मुद्रांक व नोंदणी महानिरीक्षक श्रीकर परदेशी यांनी आज गुरुवारी निलंबित केले. आदेश गुरुवारी जगताप यांना प्राप्त झाला असून, दुय्यम निबंधक म्हणून सांगली कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक टी. एस. डोंगरे यांनी कार्यभार स्वीकारला.
विटा येथील पंचमुखी गणपती मंदिराच्या पाठीमागे असलेल्या ७९९.९ चौ.मी. जागा दि. २५ नोव्हेंबर १८९० रोजी येथील दत्तो केशव भंडारे यांना ९९ वर्षांच्या कराराने भाडेतत्त्वावर देण्यात आली होती. या जागेचा करार संपल्यानंतर ही जागा भंडारे यांच्या वारसांनी मुदतवाढ न घेतला ताब्यात ठेवली. त्यानंतर ही जागा भंडारे यांच्या वारसांकडून दीपक अण्णासाहेब साळुंखे यांनी २०१३ ला दस्त क्र. १८७० ने अनधिकृतरित्या खरेदी केली होती. नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर ही जागा शासनाने ताब्यात घेऊन मालकसदरी ‘महाराष्ट्र शासन’ अशी नोंद केली होती. दस्ताची नोंद जगताप यांनी बेकायदेशीर केल्याचा आरोप करीत ाागरी हक्क संघटनेने तक्रार केली होती. या तक्रारीची पडताळणी करून परदेशी यांनी जगताप यांना निलंबित केले. डोंगरे यांनी विटा येथील दुय्यम निबंधक पदाचा कार्यभार रात्री ९ वाजण्याच्या सुमारास स्वीकारला. (वार्ताहर)
वीस महिन्यांची कारकीर्द
मुद्रांक व नोंदणी कार्यालयातील दुय्यम निबंधक जगताप यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील सासवड आहे. त्यांनी यापूर्वी पुणे येथील मुद्रांक व नोंदणी विभागाच्या मुख्य कार्यालयात काम केले आहे. मार्च २०१३ रोजी विट्याचा कार्यभार हाती घेतला होता. अवघ्या २० महिन्यांच्या विट्यातील कारकीर्दीनंतर जगताप यांना निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले.