सांगलीत मालमत्तांच्या सर्वेक्षणामुळे नागरिकांत संशयकल्लोळ
By अविनाश कोळी | Published: April 15, 2024 07:28 PM2024-04-15T19:28:20+5:302024-04-15T19:28:35+5:30
नागरिकांना शंका का येतेय?
सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महापालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून खासगी संस्थेमार्फत मालमत्तांचे सर्वेक्षण सुरू आहे. महापालिकेने याबाबतची माहिती जाहीर न केल्यामुळे, तसेच कंपनी प्रतिनिधींसमवेत महापालिका कर्मचारी नसल्याने नागरिकांतून या सर्वेक्षणावरून संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. त्यामुळे महापालिकेने योग्य ती माहिती जाहीर करून महापालिकेचे कर्मचारी सोबत द्यावेत, अशी मागणी केली जात आहे.
महापालिका क्षेत्रातील कराच्या कक्षेतून सुटलेल्या मालमत्तांचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू झाली आहे. ड्रोनद्वारे यापूर्वी सर्वेक्षण करण्यात आले होते. आता ड्रोनच्या सर्वेक्षणानुसार पडताळणी करण्यासाठी खासगी संस्था नियुक्त करण्यात आली आहे. या संस्थेचे कर्मचारी घरोघरी जाऊन मोजमाप घेऊ पाहत आहेत. मात्र, अनेक नागरिकांनी त्यांना झिडकारले. सर्वेक्षणाबाबत नागरिकांना कोणतीही माहिती नाही. महापालिकेने त्याबाबत सूचनाही दिली नाही. त्यामुळे सर्वेक्षण करणारे खरे आहेत की कोणी फसविणारे लोक आहेत, याविषयी शंका उपस्थित केली जात आहे. अनेक नागरिकांनी सर्वेक्षणास नकार देत कर्मचाऱ्यांना पिटाळले आहे.
नागरिकांना शंका का येतेय?
विविध कंपन्यांच्या ऑफर घेऊन किंवा मदत मागण्याच्या बहाण्याने अनेकदा फसवणुकीचे प्रकार सांगली, मिरजेत घडले आहेत. अशातच अनोळखी संस्था व त्यांचे प्रतिनिधी थेट घराच्या आत जाऊन माेजमाप घेणार असल्याने नागरिकांना त्यावर विश्वास बसत नाही. महापालिकेने नागरिकांना याबाबतीत कोणतेही आवाहन केलेले नाही.
सर्वेक्षण कशाबद्दल होत आहे?
महापालिका क्षेत्रात अनेक घरे, दुकाने व अन्य मालमत्तांची नाेंद कर विभागाकडे नाही. त्यामुळे महापालिकेचा कर बुडविण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे अशा मालमत्तांचा शोध घेऊन कर आकारणी करण्याच्या उद्देशाने हे सर्वेक्षण करण्यात येत आहे.
ड्रोनद्वारे सर्वेक्षण पूर्ण
महापालिकेच्या अंदाजानुसार करचुकवेगिरी करणाऱ्या एकूण ५० हजार मालमत्ता या सर्वेक्षणातून समोर येणार आहेत. याशिवाय वाढीव बांधकाम करूनही त्याची नोंद न केलेल्या मालमत्ताही सापडणार आहेत. याबाबतची प्राथमिक तपासणी ड्रोनद्वारे केली आहे.
सर्वेक्षण करणाऱ्या खासगी एजन्सीच्या कर्मचाऱ्यांकडे ओळखपत्र आहेत, मात्र महापालिकेचे अधिकृत कोणी कर्मचारी नसल्यामुळे नागरिक शंका व्यक्त करीत आहेत. सध्या सर्वत्र वेगवेगळ्या पद्धतीने फसवणारे अथवा चोरीच्या उद्देशाने फिरणारे प्रकार घडत आहेत. त्यामुळे सर्वेक्षण करताना महापालिकेचे अधिकृत कर्मचारी उपस्थित असावेत. - सतीश साखळकर, नागरिक जागृती मंच, सांगली