विवाहितेच्या खुनामागे ‘सुपारी’चा संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2017 11:18 PM2017-08-06T23:18:53+5:302017-08-06T23:18:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : दुधगाव (ता. मिरज) येथील गीतांजली मोरे या विवाहितेच्या खुनाचे गूढ रविवारी दुसºयादिवशीही कायम होते. दुधगाव, कवलापूर येथे छापे टाकून पतीसह चौघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी सुरू आहे. पण अजून कोणतीही ठोस मािहती हाती लागलेली नाही. ‘सुपारी’ देऊन तिचा खून केल्याचा संशय व्यक्त होत आहे. यामध्ये गीतांजलीच्या पतीच्या पुण्यातील एका मित्राचे नाव पुढे आले आहे.
शनिवारी सकाळी मुलगी शाळेला गेल्यानंतर गीतांजलीचा खून करण्यात आला होता. प्रथम तिचा वायरने गळा आवळला. त्यानंतर गळ्यावर व मानेवर धारदार शस्त्राने वार केल्याचे आढळून आले होते. सांगलीच्या शासकीय रुग्णालयात रात्री उशिरापर्यंत विच्छेदन तपासणी सुरू होती. यामध्ये गळ्यावर व मानेवर तीन ते पाच सेंटीमीटरचे वार आहेत. हल्ल्यासाठी गुप्तीचा वापर केल्याचा संशय आहे. गीतांजली व तिचा पती यांच्या घरातील व्यवसायावरुन वाद होते. या वादातून गीतांजलीने पती व सासू, सासºयाला घरातून बाहेर काढले होते. ती दुधगावमध्ये मुलीसोबत रहात होती. घरगुती वाद किंवा ‘नाजूक’ संबंध या कारणावरुन तिचा खून झाल्याची शक्यता व्यक्त करुन पोलिसांनी तपासाला दिशा दिली आहे. घरगुती वादाच्या मुद्याची पडताळणी करण्यासाठी तिचा पती तसेच कवलापूर येथील तीन नातेवाईकांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु ठेवली आहे. परंतु त्यांच्याकडून खुनाचे गूढ उकलेल, अशी कोणतीही माहिती पुढे आलेली नाही.
सराफी व्यवसायानिमित्ताने गीतांजलीचा पती दोन वर्षापूर्वी पुण्यात होता. गीतांजलीही त्याच्यासोबत राहत होती. याचवेळी तिची पतीच्या मित्राशी ओळख झाली. या ओळखीतून तिने मित्राचा पुण्यातील एक फ्लॅट बळकावला होता. तो विकून तिच्याकडे २५ लाखांची रक्कम आली होती. या प्रकारामुळे मित्राने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्याचे नातेवाईक गीतांजलीवर चिडून होते, अशी माहितीही तपासातून पुढे आली आहे. कदाचित हा मुद्दाही खून करण्यामागे असण्याची शक्यता आहे. कदाचित तिचा खून करण्यासाठी ‘सुपारी’ दिल्याचा संशय आहे. तशी माहिती चर्चेतून पोलिसांना मिळाली आहे. मात्र ठोस माहिती नाही. दुधगावमध्ये शेजाºयांकडे चौकशी करुन तिच्या घरी कोण आले होते का? याबद्दल रविवारीही चौकशी करण्यात आली.
प्रथम गळा आवळला
हल्लेखोर गीतांजलीच्या ओळखीचे असण्याची शक्यता आहे. त्यांच्यासोबत ती खुर्चीवर बोलत बसली असावी. कारण तिचा खुर्चीवर असतानाच प्रथम केबल वायरने गळा आवळल्याचे पुरावे मिळाले आहेत. गळा आवळलेली वायर जप्त केली आहे. तिची जीभही बाहेर आली होती. हल्लेखोरांसोबत शरीर संबंध आले होते का, याचा वैद्यकीय तपासणीतून उलगडा करण्याची मागणी पोलिसांनी केली आहे. वैद्यकीय तपासणीचा व्हिसेरा राखून पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविला आहे. त्याचा अंतिम अहवाल आल्यानंतर या गोष्टीचा उलगडा होईल.