उमराणीत शेतकऱ्याचा संशयास्पद मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 12:00 AM2019-02-04T00:00:40+5:302019-02-04T00:00:46+5:30
जत : गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या उमराणी (ता. जत) येथील हनुमंत मल्लाप्पा गुंडी (वय ३०) या तरुण शेतकºयाचा ...
जत : गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या उमराणी (ता. जत) येथील हनुमंत मल्लाप्पा गुंडी (वय ३०) या तरुण शेतकºयाचा रविवारी सायंकाळी मृतदेह सापडला. उमराणीपासून साडेतीन किलोमीटर अंतरावर बिरूळ रस्त्यावर सदाशिव रेड्डी यांच्या शेतात हा मृतदेह आढळला. अनैतिक संबंधातून त्यांचा घातपात झाला आहे, असा आरोप मृत गुंडी यांच्या नातेवाइकांनी केला आहे.
मृत गुंडी यांच्या मृतदेहाची रात्री उशिरापर्यंत विच्छेदन तपासणी सुरू होती. त्यामुळे मृत्यूचे निश्चित कारण समजू शकले नाही. त्यांचा खून झाल्याच्या शक्यतेने पोलिसांनी तपासाला दिशा दिली आहे. गुंडी हे आई, पत्नी, मुलासह उमराणीत एकत्रित राहत होते. ते शेती करीत होते. ट्रॅक्टरवर चालक म्हणूनही काम करीत होते. शुक्रवारी (दि. १) ते घरातून बाहेर पडले होते. त्यानंतर ते घरी परतले नाहीत. त्यांचा मोबाईलही बंद लागत होता. ते नातेवाइकांकडे परगावी गेले असतील, असा विचार करून पत्नी व आईने त्यांचा शोध घेतला नाही.
रविवारी सायंकाळी पाच वाजता सदाशिव रेड्डी यांच्या शेतात गुंडी यांचा मृतदेह आढळून आला. तेथील दुंडाप्पा बिरादार यांना हा मृतदेह दिसला. त्यांनी जत पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दोन दिवसांपूर्वी गुंडी यांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. या घटनेची माहिती मिळताच गुंडी यांच्या पत्नी व आईने आक्रोश केला. अनैतिक संबंधातून त्यांचा खून झाल्याचा आरोप पत्नी व आईने केला आहे.
उलटसुलट चर्चा
गुंडी यांनी आत्महत्या केली, का त्यांचा घातपात झाला आहे, याची घटनास्थळी चर्चा सुरू होती. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह विच्छेदन तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात हलविला. रात्री उशिरापर्यंत विच्छेदन तपासणी सुरू होती. त्यामुळे गुंडी यांच्या मृत्यूचे निश्चित कारण समजू शकले नाही.