Sangli: उटगी येथील विवाहितेचा संशयास्पद मृत्यू, खुनाचा संशय
By घनशाम नवाथे | Published: April 20, 2024 11:33 AM2024-04-20T11:33:24+5:302024-04-20T11:34:06+5:30
उमदी : जत तालुक्यातील उटगी येथील येथील विवाहिता चन्नाक्का महांतेश कोळगिरी (वय २०) हिचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. खून ...
उमदी : जत तालुक्यातील उटगी येथील येथील विवाहिता चन्नाक्का महांतेश कोळगिरी (वय २०) हिचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. खून की आत्महत्या याबाबत नागरिकांमधून उलट सुलट चर्चा सुरू आहे. तिचा पती महांतेश शिवाप्पा कोळगीरी याच्यावर नातेवाईकांनी संशय व्यक्त केला आहे. उमदी पोलिस याचा कसून तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेली व घटनास्थळी मिळालेली माहिती अशी, चन्नाका हिचा पती महांतेश हा व्यसनाधीन झाला आहे. त्याचे पहिले लग्न जत तालुक्यातील सोन्याळ येथील एका महिलेशी झाले होते. तिलाही मारहाण करून तिचा पाय मोडला होता. त्यानंतर दोन्ही कुंटुबात वाद होऊन सोन्याळच्या महिलेने सोडचिठ्ठी घेतली होती. त्यानंतर सहा महिन्यांनी कर्नाटकातील ख्याडगी (ता. इंडी जि. विजयपुर) येथील चन्नाका या महिलेशी वर्षभरापूर्वी विवाह झाला होता.
जत तालुक्यातील पुर्व भागातील एका महिलेशी त्याचे प्रेम संबंध असल्याचा संशय होता. यावरुन शुक्रवारी मध्यरात्री दोघांच्यात वादावादी झाली. त्यानंतर चन्नाकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे शनिवारी उघडकीस आले. परंतू तिचा गळा दाबून खून करून गळफास घेतल्याचे दाखविण्यात आल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान घटनेनंतर उमदी पोलिसानी घटनास्थळी पंचनामा करून पहाटे जत येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी आणण्यात आणला. मुलीचे नातेवाईक येणार असल्याने शवविच्छेदनाचे काम थांबविण्यात आले. सकाळी दहा वाजल्यानंतर मुलीचे नातेवाईक जत ग्रामीण रूग्णालयात आले. त्यानंतर हंबरडा फोडला. त्यामुळे ग्रामीण रूग्णालयात गर्दी झाली होती. नातेवाईकांच्या आरोपानुसार पोलिस तपास करत आहेत.