कोकळेच्या उपसरपंचांचा विहिरीत संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 11:46 PM2019-04-24T23:46:25+5:302019-04-24T23:46:35+5:30

कवठेमहांकाळ : कोकळेचे उपसरपंच रमेश बाबूराव महाजन (वय ४२) यांचा विहिरीत पडून मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू संशयास्पद असून, त्यांचा ...

Suspicious death in wells in Kokale | कोकळेच्या उपसरपंचांचा विहिरीत संशयास्पद मृत्यू

कोकळेच्या उपसरपंचांचा विहिरीत संशयास्पद मृत्यू

googlenewsNext

कवठेमहांकाळ : कोकळेचे उपसरपंच रमेश बाबूराव महाजन (वय ४२) यांचा विहिरीत पडून मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू संशयास्पद असून, त्यांचा घातपात करून मृतदेह विहिरीत टाकल्याची चर्चा आहे. याबाबत कोकळेचे पोलीसपाटील विकास हजारे यांनी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
रमेश महाजन हे कोकळेचे विद्यमान उपसरपंच होते. कोकळे येथील बसथांब्याजवळ त्यांची पानटपरी आहे. पत्नी, एक मुलगा व एक मुलगी यांच्यासह गावातील महाजन वस्ती परिसरातील घरात ते राहत होते. ते मंगळवारी दिवसभर लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत सहभागी झाले होते. मतदान प्रक्रिया संपल्यानंतर ते व काही सहकारी गावात चर्चा करीत बसले होते. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास गावातील एका मित्राची दुचाकी घेऊन ते कोकळे-करलहट्टी रस्त्यावरील माने वस्तीकडे गेले. त्यानंतर कोणाशीही त्यांचा संपर्क झाला नव्हता. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला, मात्र ते सापडले नाहीत.
बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता माने वस्तीनजीक दाजी खरात यांच्या विहिरीजवळ त्यांनी नेलेली मित्राची दुचाकी उभी होती. अनोळखी दुचाकी पाहून वस्तीवरील लोकांनी विहिरीत डोकावून पाहिले असता. विहिरीत रमेश महाजन यांचा मृतदेह आढळून आला. याबाबतची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली. पोलीसपाटील विकास हजारे यांनी याबाबत माहिती दिल्यानंतर कवठेमहांकाळ पोलिसांचे पथक घटनास्थळी आले. पोलीस व ग्रामस्थांनी विहिरीतून मृतदेह बाहेर काढला. कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
रमेश महाजन यांचा मृतदेह ज्या विहिरीत आढळून आला, त्या विहिरीत अत्यल्प पाणी आहे. त्यामुळे त्यांचा विहिरीत पडून बुडून मृत्यू झाला नसून, त्यांचा घातपात झाला असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत गावात जोरदार चर्चा असून, विद्यमान उपसरपंचाच्या संशयास्पद मृत्यूने परिसरात खळबळ उडाली आहे. उत्तरीय तपासणीचा अहवाल मिळाल्यानंतरच त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक अमितकुमार पाटील करीत आहेत.

Web Title: Suspicious death in wells in Kokale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.