सांगली: सुवर्णा पवार यांना मॉरिशस मराठी मंडळाचा पुरस्कार जाहीर, महिलांचे सक्षमीकरण आणि बालकल्याण क्षेत्रात उल्लेखनीय काम
By संतोष भिसे | Published: September 16, 2022 01:55 PM2022-09-16T13:55:34+5:302022-09-16T13:57:18+5:30
मॉरिशसचे राष्ट्राध्यक्ष पृथ्वीराज रुपन यांच्या हस्ते २७ सप्टेंबर रोजी पुरस्कार प्रदान केला जाणार
सांगली : सांगलीच्या महिला व बालविकास अधिकारी सुवर्णा पवार यांना मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशनतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महिला सबलीकरण पुरस्कार जाहीर झाला. महिलांचे सक्षमीकरण आणि बालकल्याण क्षेत्रात पवार यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन या आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली.
मॉरिशसचे राष्ट्राध्यक्ष पृथ्वीराज रुपन यांच्या हस्ते २७ सप्टेंबर रोजी तो प्रदान केला जाईल. मोका शहरातील एका विशेष कार्यक्रमात पवार यांना सन्मानित केले जाईल. मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशनचे अध्यक्ष असंत गोविंद यांनी पुरस्कारासाठी पवार यांची निवड जाहीर केली.
पवार यांनी मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी राबविलेला घासणीऐवजी लेखणी उपक्रम विशेष दखलपात्र ठरला. भिक्षेकरी मुक्त अभियान, किशोरवयीन मुलींसाठी वयात येताना, ग्रंथालय चळवळ, महिला मेळावे, व्याख्याने अशा सामाजिक चळवळीत त्या सक्रिय असतात. विविध विषयांवरील आठ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्यांना उत्कृष्ट प्रशासकीय कामाबद्दल गौरविले आहे.