इस्लामपूर, कासेगावमध्ये ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांची धरपकड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:22 AM2020-12-25T04:22:19+5:302020-12-25T04:22:19+5:30
इस्लामपूर : सांगली जिल्ह्यामध्ये सध्या सुरू असलेली किसान आत्मनिर्भर यात्रा आणि रविवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ...
इस्लामपूर : सांगली जिल्ह्यामध्ये सध्या सुरू असलेली किसान आत्मनिर्भर यात्रा आणि रविवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून कडकनाथ कोंबडी घोटाळ्याचे पडसाद उमटण्याची शक्यता लक्षात घेऊन पोेलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे. कासेगाव आणि इस्लामपूर येथे पाच कार्यकर्त्यांनी सायंकाळपर्यंत स्थानबद्ध करण्यात आले होते.
इस्लामपूर येथे स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे आणि तालुकाध्यक्ष भागवत जाधव यांना, तर कासेगाव पोलिसांनी संतोष शेळके, तानाजी साठे, रवी माने अशा तीन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. या पाचजणांसह आणखी काही कार्यकर्त्यांना पोलिसांकडून हजर होण्याचे आदेश दिले जात आहेत.
किसान आत्मनिर्भर यात्रेमधून स्वाभिमानीचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर टीका होऊ लागल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. किसान यात्रेचे निमंत्रक आमदार सदाभाऊ खोत आहेत. कडकनाथ घोटाळ्याप्रकरणी शेतकऱ्यांचा त्यांच्यावर रोष राहिल्याचे अनेकवेळा समोर आले आहे. त्यामुळे या यात्रेदरम्यान अथवा शनिवार पेठ येथे होणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या सभेवेळी कडकनाथ घोटाळ्यात फसवणूक झालेले शेतकरी कोंबड्या भिरकावतील, असा इशारा दिल्यामुळे तेथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे.