स्वाभिमानी कार्यकर्ते, पोलिसांत जोरदार झटापट : कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:39 PM2021-01-08T17:39:50+5:302021-01-08T17:41:38+5:30
Swabimani Shetkari Sanghatna SugerFactory Sangli-एकरकमी एफआरपीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी दत्त इंडिया कंपनीच्या वसंतदादा कारखान्याच्या गव्हाणीत उड्या मारण्यासाठी मोर्चा काढला होता. मोठा पोलीस फौजफाटा तैनात केल्यामुळे कारखान्याबाहेरच कार्यकर्त्यांना बॅरिकेटस् लावून रोखले.
सांगली : एकरकमी एफआरपीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी दत्त इंडिया कंपनीच्या वसंतदादा कारखान्याच्या गव्हाणीत उड्या मारण्यासाठी मोर्चा काढला होता. मोठा पोलीस फौजफाटा तैनात केल्यामुळे कारखान्याबाहेरच कार्यकर्त्यांना बॅरिकेटस् लावून रोखले.
आक्रमक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बॅरिकेटस् ओलांडून कारखान्यात घुसण्याचा प्रयत्न केल्यामुळे पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. अखेर दत्त इंडियाच्या प्रशासनाने एकरकमी एफआरपी देण्याचे मान्य केल्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले.
जिल्ह्यातील कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये एफआरपीबाबत कडेगाव येथे बैठक झाली होती. या बैठकीत एकरकमी एफआरपी देण्याचे सर्वच साखर कारखानदारांनी मान्य केले होते. गळीत हंगाम सुरू होऊन दोन महिने झाल्यानंतर सोनहिरा, उदगिरी शुगर आणि दालमिया या कारखान्यांनी शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी दिली आहे. उर्वरित एकाही कारखान्याने एकरकमी एफआरपी न देता दोन, तीन हप्त्यांमध्ये बिल देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
वसंतदादा कारखाना चालवित असलेल्या दत्त इंडिया कारखान्यानेही पहिला हप्ता दोन हजार ५०० रुपये दिला असून, उर्वरित ३९२ रुपयांचा दुसरा हप्ता प्रलंबित आहे. याप्रकरणी दत्त इंडिया कंपनी प्रशासनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेश खराडे यांनी गव्हाणीत उड्या मारणार असल्याचे निवेदन दिले होते.
तरीही कारखाना प्रशासनाने कोणतीच कार्यवाही केली नव्हती. म्हणून अखेर शुक्रवारी महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गनिमीकाव्याने दत्त इंडिया कारखान्याच्या गव्हाणीत उड्या मारण्यासाठी प्रयत्न केला; पण कारखान्याच्या सर्व बाजूला कडक पोलीस बंदोबस्त तैनात होता.
बॅरिकेटस् लावून रस्ता अडवला होता. दुपारी बाराच्या सुमारास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना कारखान्याच्या मुख्य गेटवरच पोलिसांनी अडवले. कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. त्यामुळे काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला होता.
दत्त इंडिया कंपनीचे उपाध्यक्ष मृत्युंजय शिंदे, व्यवस्थापक शरद मोरे यांनी आंदोलनस्थळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यावेळी उर्वरित बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर दहा दिवसांत वर्ग केली जातील. तसेच यापुढील ऊस गाळपास येणाऱ्या शेतकऱ्यांना एकरकमीच एफआरपी दिली जाईल, असे आश्वासन दिले.
आंदोलनात संदीप राजोबा, पोपट मोरे, संजय बेले, भागवत जाधव, भरत चौगुले, श्रीधर उदगावे, राजेंद्र माने, बाळासाहेब जाधव, महेश जगताप, राजू परीट, प्रताप पाटील, संतोष शेळके, काशिनाथ निंबाळकर, मारुती देवकर, दीपक मगदूम आदींसह शेतकरी सहभागी होते.