‘स्वाभिमानी’च्या दाव्याने भाजप, सेनेचा गोंधळ
By admin | Published: July 16, 2014 11:33 PM2014-07-16T23:33:23+5:302014-07-16T23:39:36+5:30
विधानसभा निवडणूक : सांगली, कोल्हापूरमधील जागा घटणार
सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील काही जागांसाठी आग्रही मागणी केल्यामुळे, जागांवरून आपसात भांडणाऱ्या भाजप, शिवसेनेच्या नेत्यांचा गोंधळ उडणार आहे. दोन्ही पक्षांना दोन्ही जिल्ह्यात आपल्या वाट्याच्या जागा अन्य घटकपक्षांना विशेषत: स्वाभिमानीला सोडाव्या लागण्याची चिन्हे दिसत आहेत.
स्वाभिमानी आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी चार जागांची मागणी केली होती. महायुतीच्या जागावाटपात प्रत्यक्ष त्यांना दोनच जागा मिळाल्या. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेट्टी यांच्याकडे ६५ जागांचा प्रस्ताव नुकताच दिला होता. अर्थात शेट्टी यांनी पक्षामार्फत इतक्या जागांची मागणी केली नसल्याचे स्पष्ट केले आहे. तरीही त्यांनी कोकण वगळता अन्य सर्वच ठिकाणी संघटनेची ताकद असल्याचे सांगितल्यामुळे जादा जागांची मागणी त्यांच्याकडून होऊ शकते. आरपीआयनेही राज्यभर ठिकठिकाणी जागांसाठी दावेदारी करण्याची तयारी सुरू केली आहे. रासप व शिवसंग्राम पक्षालाही जागा द्याव्या लागतील, असे शेट्टी यांनी सांगितल्याने सेना व भाजपच्या वाट्याच्या जागा घटणार आहेत. घटकपक्षांना कोणत्या पक्षाच्या जागा द्यायच्या, याबाबतही निर्णय झालेला नाही.
शेट्टी यांनी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील काही जागांसाठी आग्रह धरला आहे. या जागा नेमक्या कोणत्या आहेत, हे त्यांनी स्पष्टपणे सांगितले नाही. तरीही शिराळा व वाळव्याच्या जागेबाबत त्यांनी स्पष्टोक्ती दिली.
कोल्हापुरातील शाहुवाडीच्या जागेची सदाभाऊ खोत यांच्यासाठी त्यांनी मागणी केली आहे. प्रत्यक्षात या जागेशिवाय अन्य काही कोल्हापूर जिल्ह्यातील जागा स्वाभिमानी शेतकरी संघटना मागणार आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यातील नेमक्या किती आणि कोणत्या जागा जाणार, याबाबतची चिंता आता भाजप, सेनेतील इच्छुकांना तसेच नेत्यांना सतावू लागली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सांगली जिल्ह्यातील पाच जागा लढविण्याचे घोषित केल्याने, भाजपची चिंता वाढली आहे. भाजपचे सांगली जिल्ह्यात तीन आमदार आहेत. या तिन्ही जागा मिळतील, असे त्यांनी गृहीत धरले आहे. या जागांशिवाय जिल्ह्यातील आणखी दोन जागांसाठी ते आग्रही आहेत. आठ जागा असताना, भाजप व सेनेने पाच जागांचा हट्ट धरला आहे. त्यातच ‘स्वाभिमानी’लाही याठिकाणच्या जागा हव्या आहेत. त्यामुळे महायुतीतच आता जागावाटपावरून गोंधळ होणार आहे. (प्रतिनिधी)
तासगावसाठी रस्सीखेच
जिल्ह्यातील आठ मतदार संघांपैकी तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघ सर्वाधिक ‘फेव्हरेट’ ठरत आहे. या मतदार संघासाठी महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. रस्सीखेच दोन्ही बाजूंनी नसून, तीन बाजूंनी होत आहे. परंपरेप्रमाणे हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला येतो, पण अजितराव घोरपडेंना पक्षात घेण्यासाठी भाजपला हा मतदारसंघ हवा आहे. दुसरीकडे ‘स्वाभिमानी’चे प्रवक्ते महेश खराडे यांनीही या जागेसाठी आग्रह धरला आहे.