‘स्वाभिमानी’ला जिल्हा परिषद निवडणुकीचे वेध

By admin | Published: October 6, 2016 11:44 PM2016-10-06T23:44:10+5:302016-10-07T00:07:19+5:30

इच्छुकांची मोर्चेबांधणी : वाळवा तालुक्यातून चाचपणी सुरु

'Swabhimani' district poll watchdog | ‘स्वाभिमानी’ला जिल्हा परिषद निवडणुकीचे वेध

‘स्वाभिमानी’ला जिल्हा परिषद निवडणुकीचे वेध

Next

निवास पवार --शिरटे-- स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आता खासदारकी आणि मंत्रिपदापाठोपाठ स्थानिक स्वराज्य संस्थेमधील प्रतिनिधित्वाची ओढ लागली आहे. खासदार राजू शेट्टी यांच्याकडून गावपातळीवरील कार्यकर्त्यांद्वारे आगामी जि. प. व पं. स. निवडणुकीत पक्षाची ताकद आणि प्रतिनिधीत्व वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुका स्वाभिमानी पूर्ण ताकदीनिशी लढणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
वाळवा तालुक्यातील येडेमच्छिंद्र व लवणमाची येथे झालेल्या संपर्क दौऱ्यावेळी खासदार राजू शेट्टी यांनी कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधून स्वाभिमानीचे वाळव्यातून जि. प. ला किमान ५ तरी प्रतिनिधी असावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, तालुकाध्यक्ष जयवंत पाटील, विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष प्रशांत होनमाने, मधुकर डिसले, प्रकाश देसाई, डॉ. सचिन पाटील, सुनील सावंत आदींची प्रमुख उपस्थिती होती.
ग्रामपंचायतीपासून पं. स. ते जि. प. पर्यंत विकासकामांचा पाठपुरावा करणारी साखळी निर्माण झाली तरच कार्यकर्त्यांचे मोठे जाळे स्वाभिमानीला निर्माण करता येईल. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शेट्टी व खोत यांनी वाटचाल सुरु केली आहे.
गेल्या दोन ते तीन वर्षात स्वाभिमानीची थार बोथट झाल्याचे चित्र या परिसरात दिसून येत आहे. शेट्टी व खोत यांनी दराबाबत बाळगलेले मौन याचीही चर्चा आता उघडपणे सुरु झाली आहे. वसंतदादा सह. साखर कारखान्याने शेतकऱ्यांना गत गळीत हंगामातील उसाला एफआरपी तर सोडाच, परंतु १ रुपयाही अदा केलेला नाही. परंतु या दोघांनी याबाबत ब्र शब्दही काढलेला नाही. त्यामुळे कारखाना आणि त्यांच्यात काही सेटलमेंट झाली आहे का? असाही सवाल आता शेतकरी करू लागले आहेत.
वरील सर्व घडामोडींचा विचार करुन खासदार राजू शेट्टी यांनी गतवर्षी साखरेचा दरच कमी होता, त्यामुळे मिळेल ते पदरात घेण्याची परिस्थिती होती, असे सांगण्यास सुरुवात केली आहे. मात्र यावेळी साखरेला उच्चांकी दर असून, तो मिळवण्यासाठी आमच्या दोघांची आक्रमकता काय आहे हे होणाऱ्या ऊस परिषदेमध्ये दाखवून देऊ, असे पटवून दिले जात आहे.
केंद्र व राज्य स्तरावर पक्षाचा स्वाभिमानी बाणा टिकवून ठेवण्यासाठी स्थानिक पातळीवर संघटना मजबूत करणे गरजेचे असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानेच त्यांनी निवडणुकीपूर्वीच वातावरण तापवण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात कृष्णा काठाने यापूर्वी शेट्टी यांच्या हाकेला अनेकवेळा साथ दिली आहे. परंतु आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वाभिमानीची डाळ कितपत शिजणार, हे येणारा काळच ठरवणार आहे.


ऊस परिषेदत : ‘वसंतदादा’चा प्रश्न घ्यावा
सांगली व सातारा जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी वसंतदादा सह. साखर कारखान्याला आपला ऊस गळितासाठी पाठवला आहे. परंतु या कारखान्याने शेतकऱ्यांच्या तोंडाला अक्षरश: पाने पुसली आहेत. इतर कारखान्यांनी एफआरपी दिली नाही म्हणून स्वाभिमानीकडून आंदोलन केले जाते. परंतु वसंतदादाने पूर्ण रक्कमच बुडविली त्याचे काय? त्याविरोधात आता ऊस परिषदेत तरी आवाज उठवावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Web Title: 'Swabhimani' district poll watchdog

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.