स्वाभिमानी शेतकरी एक्स्प्रेस दिल्लीला रवाना, संसदेला घालणार घेराव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2018 02:22 PM2018-11-28T14:22:22+5:302018-11-28T14:23:33+5:30
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, सातबारा कोरा करावा, उसाचा उतारा बेस पूर्ववत ९.५ टक्के करावा या आणि इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या संसद घेराव आंदोलनासाठी 'स्वाभिमानी एक्स्प्रेस' ही विशेष रेल्वे दिल्लीला रवाना झाली.
सांगली : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, सातबारा कोरा करावा, उसाचा उतारा बेस पूर्ववत ९.५ टक्के करावा या आणि इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या संसद घेराव आंदोलनासाठी 'स्वाभिमानी एक्स्प्रेस' ही विशेष रेल्वे दिल्लीला रवाना झाली. कोल्हापूर, सांगली व सोलापूर जिल्ह्यातील १२५० हून अधिक स्वाभिमानी कार्यकर्त्यांचा यामध्ये समावेश आहे. शुक्रवार (३०नोव्हेंबर) व शनिवार (१डिसेंबर) दिल्लीतील संसदेला घेराव घालण्यात येणार आहे. या आंदोलनात देशभरातील २१० संघटनांचा सहभाग असून स्वाभिमानीचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत.
बुधवारी सकाळी १० वाजता मिरज रेल्वे स्थानकावरून ही विशेष गाडी रवाना झाली. या विशेष रेल्वेस १८ डबे असून १५ बोगी, २ जनरल डबे, १ भोजनाची व्यवस्था अशी 'स्वाभिमानी एक्स्प्रेस’ या विशेष रेल्वेची रचना आहे. 'राजू शेट्टी जिंदाबाद, स्वाभिमानी जिंदाबाद', यासहीत आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत, अशा घोषणा देत उत्साही वातावरणात विशेष स्वतंत्र रेल्वेतून कार्यकर्ते व शेतकरी संसदेकडे रवाना झाले. यावेळी काही उत्साही कार्यकर्त्यांनी जल्लोषात हल्लगी वाजवित, झेंडे फडकावित, टाळ मृदुगांचा गजर सुरु ठेवला होता.