Sangli: आष्ट्यात दत्त इंडियाच्या कार्यालयास ठोकले टाळे, ‘स्वाभिमानी’ आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 11:59 AM2023-10-31T11:59:51+5:302023-10-31T12:00:23+5:30
संगणक फाेडला; ताेडी राेखल्या; ट्रॅक्टरची हवा साेडली
आष्टा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दत्त इंडिया वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या आष्टा कार्यालयातील संगणकाची तोडफोड करून कार्यालयाला कुलूप लावले. तसेच ऊसतोडी बंद करून ट्रॅक्टरमधील हवा सोडली. साेमवारी सायंकाळी हा प्रकार घडला.
शेतकऱ्यांनी गतवर्षीच्या गळीत हंगामात पाठवलेल्या उसाचा दुसरा हप्ता चारशे रुपयेप्रमाणे मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. दुसरा हप्ता अद्याप जाहीर केला नसताना दत्त इंडिया कारखान्याने आष्टा परिसरात ऊसतोडी सुरू केल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप राजोबा, बाबासाहेब सांदरे, ज्ञानेश्वर पाटील, संजय बेले, प्रवीण कोल्हे, गिरीश पाटील, सुभाष पाटील, मयूर पाटील, भरत साजने, दीपक मगदूम, सागर वळवडे, मनोज सरडे, रोहित साळुंखे, युवराज सरडे, शीतल सांदरे, नितीन पंडित यांनी रविवारी रात्री आष्टा-सांगली मार्गावर हॉटेल बागायतदारसमोर सांगलीला निघालेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीतील हवा सोडली. आष्टा-इस्लामपूर मार्गावर आष्टा पोलिस ठाण्याजवळच दोन ट्रॅक्टरचालकांना थांबवून त्यांना विनंती करून ट्रॅक्टर माघारी नेण्यास भाग पाडले.
सोमवारी सकाळी आष्टा-बागणी मार्गावर एका शेतकऱ्याच्या शेतात सुरू असलेली दत्त इंडियाची ऊसतोड बंद पाडली. तसेच दुधगाव नाक्यावरील दत्त इंडियाच्या गट कार्यालयात घुसून संगणकाची तोडफोड केली. गट कार्यालयाला कुलूप लावले. जोपर्यंत गतवर्षीच्या उसाचा दुसरा हप्ता कारखानदार देणार नाहीत तोपर्यंत यंदाचा गळीत हंगाम सुरू करू नये, अन्यथा स्वाभिमानी स्वस्थ बसणार नाही, असा इशारा संदीप राजोबा यांनी यावेळी दिला.