तासगावात स्वाभिमानीचा खासदारांच्या कार्यालयावर माेर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:19 AM2021-07-21T04:19:05+5:302021-07-21T04:19:05+5:30
ओळ : तासगाव येथे मंगळवारी भरपावसात खासदार संजयकाका पाटील व आंदोलक शेतकऱ्यांमध्ये चर्चा झाली. तासगाव : मी कुणाचा एक ...
ओळ : तासगाव येथे मंगळवारी भरपावसात खासदार संजयकाका पाटील व आंदोलक शेतकऱ्यांमध्ये चर्चा झाली.
तासगाव : मी कुणाचा एक रुपयाही बुडवणार नाही. पंधरा दिवसांच्या आत सगळ्यांचे पैसे दिले जातील, असे खासदार संजयकाका पाटील यांनी सांगूनही शेतकरी ‘आश्वासन नको, तर पैसे द्या’ या मागणीवर ठाम राहिले. भर पावसात संजयकाकांनी अत्यंत संयमितपणे शेतकऱ्यांना भावनिक आवाहन केले. मात्र, पैसे घेतल्याशिवाय परत जाणार नाही, या मागणीवर ठाम राहत शेतकऱ्यांनी मंगळवारी खासदारांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरूच ठेवले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली तासगाव व नागेवाडी कारखान्याला ऊस घातलेल्या शेतकऱ्यांनी अद्याप बिल न मिळाल्यामुळे ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला होता. मंगळवारी सकाळपासून शेतकरी कॉंग्रेस भवन परिसरात जमा झाले. तिथून त्यांनी मोर्चाने मानखेड येथील संजयकाका पाटील यांच्या कार्यालयावर धडक दिली. ठिय्या आंदोलन करीत घोषणाबाजी केली.
यापूर्वीच्या आंदोलनावेळी कारखान्याचे व्यवस्थापक आर. डी. पाटील हे आंदोलकांना सामोरे गेले होते. त्यांनी दाेनवेळा पंधरा दिवसांची मुदत यापूर्वीच मागून घेतली हाेती. त्यामुळे शेतकरी यावेळी त्यांच्याशी चर्चा करण्याच्या मन:स्थितीत नव्हते. महेश काळे व सहकाऱ्यांनी आंदोलनाची भूमिका मांडली.
आंदोलन सुरू असताना मुसळधार पाऊस सुरू झाला. याचवेळी संजयकाका पाटील त्यांना सामाेरे आले. मुसळधार पावसातच खासदारांनी शेतकरी व त्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा सुरू केली. आपल्या अडचणी शेतकऱ्यांसमोर मांडल्या. राजकीय कुरघाेड्यांमुळे आपले कर्ज प्रकरण थांबले आहे. त्यामुळे पैसे देण्यास विलंब होत आहे. १५ दिवसांच्या आत शेतकऱ्यांना पैसे वर्ग केले जातील. एक पैसाही कोणाचा बुडवणार नाही, अशी ग्वाही देऊन त्यांनी आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले.
त्यानंतर शेतकऱ्यांनी खासदारांसमोर आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘आश्वासन नको, तर पैसे द्या’ अशी मागणी केली. सर्व शेतकऱ्यांनी पैसे घेतल्याशिवाय परत जाणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संदीप राजोबा, संजय बेले, राजेंद्र माने, अशोक खाडे, दामाजी डुबल, गुलाबराव यादव, सचिन पाटील, भुजंग पाटील, संदेश पाटील, शशिकांत माने, महेश जगताप, संदीप शिरोटे, माणिक शिरोटे, धन्यकुमार पाटील, शिवाजी भोसले, सिद्धू जाधव, प्रदीप लाड, तानाजी सागर, कुंडलिक बाबर, गणेश शिंदे, सचिन महाडिक, अख्तर संडे, तानाजी धनवडे, सचिन चव्हाण, मुकेश चिंचवाडे, विनायक पवार, राहुल शेडबाले आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.