'स्वाभिमानी'कडून सांगली-पेठ रस्त्याच्या खड्ड्यात वृक्षारोपण, ..तर अधिकाऱ्यांना कोंडून घालण्याचा दिला इशारा
By अशोक डोंबाळे | Published: November 5, 2022 06:16 PM2022-11-05T18:16:04+5:302022-11-05T18:17:12+5:30
रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ता अशी अवस्था
सांगली : सांगली ते पेठ रस्ता आता रहदारीसाठी राहिलेला नाही. रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ता अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे शनिवारी रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा निषेध केला. रस्ता तत्काळ झाला नाही तर अधिकाऱ्यांना कोंडून घालू, असा इशारा स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला.
स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी भागवत जाधव, जगन्नाथ भोसले, अरुण कवठेकर, तानाजी साठे, भरत पाटील, प्रभाकर पाटील, राम पाटील, काशिनाथ निंबाळकर, अभय मंजुगडे, आदींसह शेतकरी उपस्थित होते.
महेश खराडे म्हणाले की, सांगली ते पेठ रस्ता दर्जेदार करण्याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून प्रवाशांची मागणी आहे. सांगली शहरातील नागरिकांनी या रस्त्यासाठी अनेकवेळा आंदोलनेही केली आहेत. तरीही या रस्त्याकडे अधिकारी आणि लोकप्रतिनिधीही लक्ष देत नसल्यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांचे मोठे हाल सुरू आहे. खराब रस्त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. अनेक महिलांची रस्त्यातच प्रसूती झाली आहे. रस्त्याचे काम उत्कृष्ट होत नाही, केवळ डागडुजी केली जाते. लोकांचा वेळ, पेट्रोल, डिझेल मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
अधिकाऱ्यांनी वाद थांबवून रस्त्याचे काम करावे : महेश खराडे
सांगली ते पेठ रस्ता राज्य शासनाकडे की केंद्राच्या हायवे प्राधिकरणाकडे आहे या वादात रस्त्याचे काम रखडले आहे. अधिकाऱ्यांच्या या वादात सामान्य नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. याकडे गांभीर्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. यापुढे या रस्त्यावर अपघातात कुणाचा जीव गेला तर त्याला जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दोषी धरून त्यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार आहे, असा इशाराही महेश खराडे यांनी दिला आहे