'स्वाभिमानी'ची १२ ऑक्टोबरपासून सांगली जिल्ह्यात जनआक्रोश पदयात्रा
By अशोक डोंबाळे | Published: October 2, 2023 06:41 PM2023-10-02T18:41:02+5:302023-10-02T18:41:32+5:30
मागील थकबाकी देण्यासह उसाला ४००० दराची मागणी
सांगली : साखर कारखान्यांनी मागील गळीत हंगामातील थकीत ४०० रुपये आणि चालू गळीत हंगामासाठी प्रतिटन चार हजार रुपये दर मिळावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे दि. १२ ऑक्टोबरपासून जनआक्रोश पदयात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेत मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होणार आहेत, अशी माहिती स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली.
महेश खराडे म्हणाले, गणपतीला साकडे घालून गणपती मंदिरापासून गुरुवार दि. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता होणार आहे. तेथून ही पदयात्रा मिरज येथे जाणार आहे. मालगाव, मल्लेवाडी, बेडगमार्गे दि. १३ रोजी सायंकाळी ५ वाजता मोहनराव शिंदे कारखाना येथे जाणार आहे. एरंडोली, शिपूर, सलगरे, कोंगनोळी, हिंगणगावमार्गे महाकाली कारखान्यावर कवठेमहांकाळ येथे १५ ऑक्टोबर रोजी ४ वाजता यात्रा पोहोचणार आहे. दि. २२ ऑक्टोबर दुपारी २ वाजता उदगिरी कारखान्यावर सभा होणार आहे.
दि. २३ रोजी दुपारी ५ वाजता खानापूर तालुक्यातील नागेवाडी येथील कारखान्यावर यात्रा पोहोचणार आहे. त्यानंतर दि. २६ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता केन ॲग्रो, दि. २७ ऑक्टोबर रोजी ५ वाजता यात्रा सोनहिरा साखर कारखाना, दि. २९ रोजी ५ वाजता तासगाव कारखाना, दि. १ नोव्हेंबर रोजी क्रांती कारखाना कुंडल यात्रा पोहचणार आहे.
माजी खासदार राजू शेट्टी यांची कोल्हापूर जिल्ह्यातील पदयात्रा दि. १ नोव्हेंबर रोजी कुंडल येथील क्रांती कारखान्यावर एकत्र येणार आहेत. येथून दोन्ही पदयात्रा एकत्रित हुतात्मा, सांगलीतील दत्त इंडिया आणि सर्वोदय कारखान्यावरून कोल्हापूर जिल्ह्यात जाणार आहे. या पदयात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये जागृती करून ऊस तोडायला द्यावे लागणारे पैसे बंद करणे, साखर उताऱ्यातील चोरी थांबविणे, द्राक्ष बेदाणा महामंडळ स्थापन करावे, दुधाला हमी भाव मिळाला पाहिजे, आदी मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जनआक्रोश पदयात्रेचा हेतू आहे.