महामार्गाबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:37 AM2020-12-30T04:37:40+5:302020-12-30T04:37:40+5:30
भूमिअभिलेख यांच्याकडून लेखी आश्वासन स्वीकारताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी. पलूस : महामार्गाबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाला, भूमिअभिलेख विभागाकडून ...
भूमिअभिलेख यांच्याकडून लेखी आश्वासन स्वीकारताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी.
पलूस : महामार्गाबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाला, भूमिअभिलेख विभागाकडून मिळालेल्या लेखी आश्वासनानंतर स्थगिती देण्यात आल्याची माहिती पलूस तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटोचे अध्यक्ष सुधीर जाधव यांनी मंगळवारी दिली.
दि. ३० रोजी पलूस भूमिअभिलेख कार्यालयासमोर नोटिसीची होळी व शिमगा आंदोलन होणार होते. याबाबत तहसील कार्यालयामध्ये प्रांताधिकारी गणेश मरकड, महामार्ग विभाग मोजणी अभियंता, पलूस पोलीस स्टेशनचे अधिकारी यांची पलूस, सांडगेवाडी, बांबवडे हद्दीतील बाधित शेतकऱ्यांबरोबर बैठक झाली. या बैठकीत ज्या शेतकऱ्यांना मोजणी करण्याच्या गटाबाबत शंका व संभ्रम असतील, त्यांनी साध्या मोजणीसाठी रक्कम भरून चतु:सीमा मोजणी व हद्द कायम करण्यात यावी, या मुद्द्यावर शेतकरी व प्रशासन यांच्यामध्ये एकमत झाले. यावेळी लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
शेवटच्या शेतकऱ्यास भरपाई मिळेपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना बाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी राहील, असे सुधीर जाधव यांनी सांगितले.