इस्लामपुरात वीजबिल माफीसाठी स्वाभिमानीचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:24 AM2021-03-20T04:24:39+5:302021-03-20T04:24:39+5:30
इस्लामपूर येथे वीजबिल माफीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : गेल्या ...
इस्लामपूर येथे वीजबिल माफीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : गेल्या वर्षीच्या मार्च २०२० पासून लॉकडाऊन कालावधीत महावितरण कंपनीने दिलेले वीजबिल पूर्णत: माफ करावे,या मागणीसाठी शुक्रवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी इस्लामपूर-सांगली रस्त्यावर वाहतूक अडवून आंदोलन केले. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक चकमक झाली. शेवटी पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले.
येथील चव्हाण कॉर्नरजवळ स्वाभिमानीचे प्रवक्ते अॅड. एस. यू. संदे, तालुकाध्यक्ष भागवत जाधव, आप्पासाहेब पाटील, कॉ. दिग्विजय पाटील, पोपट मोरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी वीजबिल माफीसाठी जोरदार घोषणाबाजी केली.
भागवत जाधव म्हणाले, सरकारने राज्यातील सामान्य जनता आणि शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. अधिवेशनातच सरकारने फसवणूक केली आहे. त्यामुळे शेतकरी आणि जनतेत तीव्र असंतोष आहे. लॉकडाऊन काळात महावितरण कंपनीने दरवाढ करून अवाजवी बिले दिली आहेत. त्यामुळे ही वीजबिले तातडीने माफ करावीत.
यावेळी महावितरणचे कार्यकारी अभियंता संतोष करांडे यांना निवेदन देत शेतकरी आणि सामान्य जनता गेल्या वर्षभरापासून बेरोजगारी आणि वाढती महागाई यामुळे मेटाकुटीला आली आहे. त्यामुळे महावितरणने वीजबिल वसुलीसाठी कोणाचेही कनेक्शन तोडू नये, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.
यावेळी राम पाटील, जगन्नाथ भाेसले, खासेराव निंबाळकर, संतोष शेळके, तानाजी साठे, प्रभाकर पाटील, देवेंद्र धस, शिवाजी मोरे, रमेश पाटील, शहाजी पाटील, उदय गायकवाड, आबासाहेब शिंदे उपस्थित होते.