तासगावात ‘स्वाभिमानी’चे भीख मांगो आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:17 AM2021-07-22T04:17:45+5:302021-07-22T04:17:45+5:30
तासगाव : तासगाव आणि नागेवाडी साखर कारखान्याचे थकीत ऊस बिल मिळावे, या मागणीसाठी बुधवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शहरात फिरून ...
तासगाव : तासगाव आणि नागेवाडी साखर कारखान्याचे थकीत ऊस बिल मिळावे, या मागणीसाठी बुधवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शहरात फिरून भीख मांगो आंदोलन केले. खासदारांच्या संपर्क कार्यालयासमोर ऊस बिलाच्या मागणीसाठी मंगळवारपासून सुरू असलेले ठिय्या आंदोलन बुधवारीही कायम होते.
ऊस बिलासाठी खासदारांच्या कार्यालयावर ठिय्या मारलेले शेतकरी भीक मागून जमलेल्या भाजी-भाकरीतून आपली गुजराण करणार आहेत पण, बिल मिळाल्याशिवाय मागे हटणार नाहीत, असा निर्धार यावेळी करण्यात आला. यावेळी पोलीस आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये घोषणाबाजीवरून वादावादी झाली.
खासदार संजय पाटील यांच्या तासगाव आणि नागेवाडी कारखान्याची ऊस बिले गेल्या सहा महिन्यांपासून थकीत आहेत. थकीत ऊसबिलासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलने केली. मात्र बिल मिळाले नाही. त्यामुळे आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी मंगळवारी महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली तासगाव शहरातून मोर्चा काढून खासदार पाटील यांच्या मार्केट यार्डातील संपर्क कार्यालयावर ठिय्या आंदोलनास सुरुवात केली आहे.
आक्रमक कार्यकर्त्यांनी खासदारांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. त्यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप केला. यातून पोलीस आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादीही झाली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला.
आंदोलनात महेश खराडे, संजय बेले, संदीप राजोबा, भागवत जाधव, अशोक खाडे, गुलाबराव यादव, भुजंग पाटील, संदीप शिरोटे, माणिक शिरोटे, सुशांत जाधव, राजेंद्र पाटील, राहुल कोळी, अभिजित पाटील, सुधाकर जाधव आदीसह शेतकरी सहभागी झाले.