विटा शहराचा दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान, शहरात जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2021 04:31 PM2021-11-20T16:31:37+5:302021-11-20T16:32:09+5:30
विटा : स्वच्छ भारत अभियान २०२१ सर्व्हेक्षणात देशातील क्रमांक एकचे स्वच्छ शहर ठरलेल्या सांगली जिल्ह्यातील विटा शहराला शनिवारी दिल्लीत ...
विटा : स्वच्छ भारत अभियान २०२१ सर्व्हेक्षणात देशातील क्रमांक एकचे स्वच्छ शहर ठरलेल्या सांगली जिल्ह्यातील विटा शहराला शनिवारी दिल्लीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते गौरविण्यात आले. दिल्लीत पार पडलेल्या या शानदार सोहळ्यात राष्ट्रपतींच्या हस्ते नगराध्यक्षा प्रतिभा पाटील, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, मुख्याधिकारी अतुल पाटील व सफाई कर्मचारी शांताबाई हत्तीकर यांनी पुरस्कार स्वीकारला.
विटा शहरात कचरा कुंडीमुक्त शहर, कचऱ्याचे विलगीकरण व त्यापासून विविध वस्तूंची निर्मिती, घनकचरा व्यवस्थापन, आरोग्य, कचऱ्यापासून वीज निर्मिती, सेंद्रीय खत निर्मिती यासह विविध बाबींची केंद्रीय समितीने पहाणी केली होती. यानंतर विटा हे देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून जाहीर केले होते.
शनिवारी सकाळी ११ वाजता दिल्ली येथील विज्ञान भवनमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते विटा शहराचा गौरव करण्यात आला. यावेळी केंद्रीय नगरविकास आवास मंत्री हरदीप सिंह पुरी, राज्यमंत्री कौशल किशोर, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमंग उपस्थित होते.
नगराध्यक्षा प्रतिभा पाटील, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, मुख्याधिकारी अतुल पाटील, महिला सफाई कर्मचारी शांताबाई हत्तीकर यांनी राष्ट्रपतींच्याहस्ते स्वच्छ शहराचा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार स्वीकारला.
विटेकर झाले साक्षीदार
दिल्ली येथे सुरू असलेला नेत्रदीपक सोहळा विटा येथील नागरीकांना प्रत्यक्षात पाहता यावा, यासाठी शनिवारी नगरपरिषदेच्या आवारात मोठी स्क्रिन बसवून त्यावर थेट प्रेक्षपण करण्यात आले. माजी आ. सदाशिवराव पाटील यांच्यासह पालीकेचे कर्मचारी व नागरीकांनी विटा शहराला राष्ट्रपतींनी पुरस्कार प्रदान केल्यानंतर नागरीकांनी जल्लोष केला. दिल्लीच्या या सोहळ्याचे विटेकर साक्षीदार झाले.
शांताबाई झाल्या भावूक
गेल्या ३४ वर्षापासून हातात झाडू घेऊन शहराची सेवा करणाऱ्या महिला सफाई कर्मचारी शांताबाई उत्तम हत्तीकर यांना राष्ट्रपतींच्या व्यासपीठावर जाण्याचे भाग्य मिळाले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी राष्ट्रपतींना शांताबाईंची ओळख करून दिली. या शानदार सोहळ्यात सहभागी होण्याचे भाग्य लाभल्याने शांताबाई भावूक झाल्या होत्या.