मृत व्यक्तींच्या नावावरील जागा गिळंकृत

By admin | Published: January 13, 2015 11:42 PM2015-01-13T23:42:21+5:302015-01-14T00:29:06+5:30

बनावट दस्त : मालकी हक्कासाठी न्यायालयीन लढा, खरेदीदारांमध्ये संघर्ष

Swallow the place of dead people | मृत व्यक्तींच्या नावावरील जागा गिळंकृत

मृत व्यक्तींच्या नावावरील जागा गिळंकृत

Next

सचिन लाड - सांगली -‘लॅण्डमाफिया’ टोळ्यांनी मृत व्यक्तींचेही प्लॉट बळकाविल्याची अनेक प्रकरणे चव्हाट्यावर आली आहेत. मृत व्यक्तीने प्लॉट विक्री केल्याचा बनावट दस्त करून त्यांनी या प्लॉटची तीन ते चारजणांना विक्री केली आहे. यामुळे प्लॉटचा मालक कोण, यासाठी खरेदीदारांमध्ये वाद सुरू आहेत. हे वाद न्यायालयापर्यंत गेले आहेत. गुंठेवारीतील प्लॉटच्या खरेदी-विक्रीची कोठेच नोंद होत नसल्याने लॅण्डमाफियांनी धुमाकूळ घातला आहे.
लॅण्डमाफिया टोळ्यांचे तलाठी, नगरभूमापन, महापालिका या शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांशी घनिष्ठ संबंध आहेत. यातून ते गुंठेवारीतील प्लॉटचे मालक कोण आहेत, ते जिवंत आहेत का नाही, याची माहिती घेतात. मालक मृत झाल्याचे समजले, तर ते त्याच्या नावाचा बनावट दस्त तयार करुन घेतात. या दस्तामध्ये जागेचे क्षेत्रफळ व मृत व्यक्तीने प्लॉट नावावर केल्याचा मजकूर असतो. ग्राहकाचा शोध घेऊन ते त्यांना दस्त दाखवितात. या दस्ताविषयी ग्राहकांना जराही संशय येत नाही. त्यामुळे ते प्लॉट खरेदी करतात. पुन्हा हाच दस्त दाखवून त्यांनी या प्लॉटची आणखी दोघा-तिघांना विक्री केली आहे. खरेदीदार प्रत्यक्षात प्लॉटवर गेल्यानंतर, तिथे दुसऱ्याच व्यक्तीचे अतिक्रमण दिसून येते.
एखाद्या व्यक्तीचा प्लॉट खरेदी केला आणि त्या व्यक्तीचे निधन झाले, तर खरेदीदाराचा त्या प्लॉटवरील हक्क संपतो. मृताच्या वारसांनी संमती दिली, तरच खरेदीदाराच्या नावावर तो प्लॉट होतो. यामुळे लॅण्डमाफिया अशा मृत व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्या प्लॉटचा बनावट खरेदी-विक्रीचा दस्त बनवून विक्री करीत आहेत. त्यांच्या कारमान्याने अनेकांना आर्थिक गंडा बसला आहे. तक्रार करुनही शासकीय दरबारी दखल घेतली जात नाही. त्यामुळे फसवणूक झालेल्या लोकांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. प्लॉट फसवणुकीच्या अनेक प्रकरणांवर न्यायालयात सुनावणी सुरु आहे.
काही प्रकरणांवर दहा ते पंधरा वर्षांपासून सुनावणी सुरु आहे. मात्र अद्याप निकाल लागलेले नाहीत. आज ना उद्या निकाल लागेल, या आशेवर लोक आहेत.

विधवा, अपंगांनाही गंडा
महापालिका क्षेत्रातील विधवा महिला व अपंग व्यक्तींच्या असहायतेचा गैरफायदा घेऊन प्लॉट टोळीने बळकाविले आहेत. विधवा महिला व अपंगांनी प्लॉट ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला; मात्र टोळीने दहशतीच्या जोरावर त्यांना शांत बसविले आहे. त्यांनी या प्लॉटचा नाद सोडला आहे. गुंठेवारीतील प्लॉट खरेदी-विक्रीची नोंदच होत नसल्याने लॅण्डमाफिया टोळ्यांचा फसवणुकीचा उद्योग जोमात आहे. नोंदणीकृत वकिलासमोर खरेदी-विक्रीचा दस्त बनविला जातो. या दस्तावर फोटोही नसतात. केवळ नाव आणि पत्ता याचाच उल्लेख असतो. खरेदी-विक्रीच्या नोंदी सुरू केल्या तर, फसवणुकीच्या या प्रकारांना आळा बसू शकतो. यासाठी महापालिकेने पुढाकार घेण्याची गरज आहे.

Web Title: Swallow the place of dead people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.