स्वामी विवेकानंद विज्ञाननिष्ठ समाजवादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 11:31 PM2017-10-02T23:31:50+5:302017-10-02T23:31:50+5:30

Swami Vivekananda Vishwanath Samajwadi | स्वामी विवेकानंद विज्ञाननिष्ठ समाजवादी

स्वामी विवेकानंद विज्ञाननिष्ठ समाजवादी

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : स्वामी विवेकानंद यांनी धर्म व विज्ञानाची सांगड घातली. ते धर्मातील रुढी-परंपरा, अज्ञान, दारिद्र्य, अंधश्रद्धेत रुतलेल्या जनतेच्या मुक्तीचा मार्ग शोधणारे विज्ञाननिष्ठ समाजवादी होते, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर यांनी सोमवारी व्यक्त केले.
सांगलीतील मराठा समाजच्यावतीने अंधश्रद्धा आणि अनिष्ट प्रथा निर्मूलन उपक्रमांतर्गत आयोजित ‘स्वामी विवेकानंदांची खरी ओळख’ या विषयावरील व्याख्यानात डॉ. दाभोलकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील होते. यावेळी राज्यस्तरीय ‘अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ता’ पुरस्कार नाशिकचे कृष्णा चांदुगडे यांना, तर जिल्हास्तरीय पुरस्कार आटपाडीचे सुनील भिंगे यांना देण्यात आला.
दाभोलकर म्हणाले की, स्वामी विवेकानंद हिंदू धर्माचे अभ्यासक, विचारवंत होते, अशी ओळख निर्माण केली गेली. ही ओळख एकांगी, अपुरी व विकृत आहे. त्यांच्या लेख-पत्रांवरुन ते सप्रमाण सिध्द करता येते. त्यांनी भविष्य, चमत्कार नाकारला होता. विज्ञान व धर्म यांचा कार्यकारण भाव एकच असला तरी, विज्ञान मात्र ‘का’ व ‘कसे’ हे सांगते, अशी त्यांची विचारधारा होती. ते विज्ञाननिष्ठ होते. रुढी बदलल्या तरी धर्म बदलत नाही. चमत्कार हा सत्यप्राप्तीच्या मार्गातील अडथळा आहे, यावर त्यांचा विश्वास होता. रुढी-परंपरा बदलल्या नाहीत, तर देश रसातळाला जाईल. धर्मग्रंथातील एखादी गोष्ट, विचार पटला नाही, तर तो नाकारावा, असे ते सांगत. गोहत्येबाबत त्यांचे विचार स्वातंत्र्यवीर सावरकरांशी मिळतेजुळते होते. स्त्रीमुक्तीबाबत त्यांचे विचार स्पष्ट होते. स्त्री-पुरूष समतोल असल्याशिवाय घर, राष्ट्राची उभारणी होऊ शकत नाही. मंदिरांची दारे वारांगनांसाठी उघडी असली पाहिजेत, हे त्यांचे विचार, आजच्या स्त्रीमुक्ती आंदोलनातील महिलांसाठी प्रेरणादायी आहेत.
जातीअंताच्या लढ्यातही विवेकानंदांचे योगदान आहे. मुस्लिम, ख्रिश्चनांपेक्षा उच्चवर्णियांच्या अत्याचारामुळे धर्मांतरे झाली आहेत. त्यांनी हिंदू-मुस्लिमात समन्वय साधण्यासाठी पुढाकार घेतला. धर्माचा आधार घेऊन त्यांनी अनिष्ट रुढीवर आघात केला. माणसाला जिवंत राहण्यासाठी केवळ पाणी, अन्न, हवा या गोष्टींसोबतच आचार, उच्चार आणि विचारस्वातंत्र्य हवे, अशी त्यांची धारणा होती. ज्ञानगत, कर्मगत व अर्थगत ही जातीव्यवस्थेपेक्षाही वाईट आहे, असे ते मानत. मानवजातीने शोधलेल्या विविध वादात समाजवाद त्यांना चांगला वाटत होता. तो परिपूर्ण नसला तरी, गरीब, दलितांची स्थिती समाजवादामुळे सुधारेल, असे त्यांना वाटत होते, असेही दाभोलकर यावेळी म्हणाले.
यावेळी जिल्हाधिकारी काळम-पाटील यांनीही मार्गदर्शन केले. प्रारंभी मराठा समाजचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. प्रा. पी. आर. आर्डे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी मराठा समाजतर्फे घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वाटप करण्यात आले.
या स्पर्धेतील विजेता अक्षय पाटील याचे ‘सोशल मीडियाचा अतिरेक’ या विषयावर भाषण झाले. सुधीर सावंत यांनी आभार मानले, तर प्रा. शशिकांत जाधव यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Swami Vivekananda Vishwanath Samajwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.