Sangli: अपंगत्वावर मात करून स्वप्नीलने पटकाविला 'आयर्न मॅन'चा किताब, विटाच्या शिरपेचात मानाचा तुरा 

By हणमंत पाटील | Published: October 16, 2023 05:37 PM2023-10-16T17:37:08+5:302023-10-16T17:37:18+5:30

जन्मताच अपंगत्व, तरीही नाही खचला; अन् 'आयर्न मॅन'चा किताब पटकाविला

Swapnil Basagare overcomes disability and wins the title of Iron Man | Sangli: अपंगत्वावर मात करून स्वप्नीलने पटकाविला 'आयर्न मॅन'चा किताब, विटाच्या शिरपेचात मानाचा तुरा 

Sangli: अपंगत्वावर मात करून स्वप्नीलने पटकाविला 'आयर्न मॅन'चा किताब, विटाच्या शिरपेचात मानाचा तुरा 

दिलीप मोहिते

विटा : जन्मताच उजवा हात व पायाला अपंगत्व. पण या शारिरीक अंपगत्वाने खचून तो घरी बसला नाही. विटा (ता.खानापूर) येथील स्वप्निल बसागरे या तरूणाने गोवा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय ट्रायएथलॉन स्पर्धेत सहभाग घेतला. अपंगत्वावर मात करून ३ तास ४० मिनिटांमध्ये ९० किलोमीटरचे सायकलिंग करीत ‘आयर्न मॅन’चा किताब पटकावून विटानगरीतील नागरिकांची मान उंचाविणारी कामगिरी केली.

विटा येथील स्वप्निल बसागरे या तरूणाच्या उजव्या हाताला व पायाला जन्मताच अपंगत्व आहे. परंतु, त्याची सर्वच क्षेत्रात जिद्द व चिकाटी कायम राहिली आहे. अपंग असल्याचे कोणतेही शल्य मनात न बाळगता त्याने विविध स्पर्धेत सहभाग नोंदविला. स्पर्धा कोणतीही असो, आव्हान स्वीकारणे हा त्याचा स्वभाव झाला आहे. मग, स्पर्धा कोणतीही असो, चमकदार कामगिरी करणे हे त्याचे ध्येय असते.

गोवा येथील पणजीमध्ये इंटरनॅशनल ट्रायएथलॉन ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत ५० देशातील सुमारे १ हजार ६०० स्पर्धक सहभागी झाले होते. ही स्पर्धा अत्यंत खडतर समजली जाते. या पोहणे, सायकल चालविणे तसेच धावणे असे ११३ कि.मी.चे विविध टप्पे निश्चित वेळेत म्हणजे ८ तास ३० मिनीटांत पूर्ण करावे लागतात. त्यावेळी ‘आयर्न मॅन’चा किताब मिळतो.

रिले टीममधून केली कामगिरी..

विटा येथील स्वप्निल बसागरे हा तरूण सायकलिंगसाठी रिले टीममध्ये सहभागी होता. शारिरीक अपंगत्व असल्याने त्याने सायकलच्या गिअर व अन्य पार्टमध्ये बदल करून घेतला होता. उजवा हात व पायाला अपंगत्व असल्याने त्याने सायकलच्या उजव्या बाजूला असलेले गिअर डाव्या बाजूला बसवून घेतले होते. गेल्या आठ महिन्यापासून स्वप्निल हा या स्पर्धेसाठी सातत्याने सराव करीत होता. त्यानंतर गेल्या आठवड्यात गोवा येथे या स्पर्धा पार पडल्या. सायकलिंगसाठी चार तासात ९० कि. मी. चे अंतर पार करण्याचे मोठे आव्हान स्वप्निल पूर्ण केले.

कोल्हापुरात लोह पुरूष किताब..

गेल्या महिन्यात कोल्हापूर स्पोटर्स क्लबच्यावतीने या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत स्वप्निल बसागरे यांनी ३५ मिनिटे ३ सेकंदात पाऊण कि.मी. पोहणे, ४३ मिनिटांत ५ कि.मी. धावणे व ४५ मिनिटे ३१ सेकंदात २० कि.मी.चे सायकलिंग करून ‘लोह पुरूष’चा किताब पटकाविला होता.

Web Title: Swapnil Basagare overcomes disability and wins the title of Iron Man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली