देववाडीतील स्वप्निलची कुस्तीसाठी कठोर मेहनत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:41 AM2021-02-23T04:41:01+5:302021-02-23T04:41:01+5:30
विकास शहा लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : देववाडी (ता. शिराळा) येथील पैलवान स्वप्निल खोत याने आपल्या पायाची दहा दिवसांपूर्वी ...
विकास शहा
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा
: देववाडी (ता. शिराळा) येथील पैलवान स्वप्निल खोत याने आपल्या पायाची दहा दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया होऊनही कांदे येथे आयोजित कुस्ती स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला. डोळ्यांचे पारणे फेडणारी कुस्ती करत त्याने कुस्तीप्रेमींची मने जिंकली.
स्वप्निल गेले दोन वर्षे कुस्तीचा सराव करत आहे. त्याचे वडील ज्ञानदेव पांडुरंग खोत हे रोजंदारीवर आपले कुटुंब चालवतात. अशा परिस्थितीत स्वप्निलने आपला कुस्तीचा नाद कायम ठेवला आहे. कोरोना काळात तालीम बंद असूनही त्याने व्यायामात सातत्य ठेवले होते.
कांदे येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत देववाडीच्या जय हनुमान तालीमतर्फे स्वप्निलने ५० किलो वजनी गटात डोळ्यांचे पारणे फेडणारी कुस्ती केली. स्पर्धेपूर्वी दहा दिवसांपूर्वी त्याच्या पायाला शेतात काम करत असताना मोठी जखम झाली होती. त्याच्यावर लहान शस्त्रक्रियाही झाली होती. मात्र, याची पर्वा न करता त्याने कुस्तीत यश मिळविले.
घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने तो चुलत्यांची बैलगाडी घेऊन साखर कारखान्याला उसाची वाहतूक करतो. त्यांना मदत म्हणून तो ऊसतोडणी व भरणी करण्यासाठी वेळोवेळी जातो. हे करत आसताना तो त्याचे शिक्षण आणि तालीम यामध्ये खंड पडू देत नाही. शेतात कितीही काबाडकष्ट केले तरी तो तालमीतील मेहनत चुकवत नाही.
चाैकट
अहोरात्र न थकता मेहनत
आता कुमार केसरी सामने राज्यस्तरीय सराव चाचणीसाठी त्याचा प्रयत्न आहे. स्वप्न कायम मोठे असावे. त्याचा पाठलाग करण्यासाठी अहोरात्र न थकता मेहनत आणि सातत्य असल्याने कोणतीही गोष्ट अवघड नसते, याचा प्रत्यय स्वप्निलच्या कष्टामुळे दिसून येतो.