घरासमोर खाट ठेवल्यावरून स्वप्नीलचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:26 AM2021-03-18T04:26:38+5:302021-03-18T04:26:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : मिरज तालुक्यातील कर्नाळ येथील भोरा म्हसोबा मंदिराजवळ तरुणाचा पाठलाग करून धारदार शस्त्राने वार ...

Swapnil's murder after placing a bed in front of the house | घरासमोर खाट ठेवल्यावरून स्वप्नीलचा खून

घरासमोर खाट ठेवल्यावरून स्वप्नीलचा खून

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : मिरज तालुक्यातील कर्नाळ येथील भोरा म्हसोबा मंदिराजवळ तरुणाचा पाठलाग करून धारदार शस्त्राने वार करून खून करणाऱ्या आठ जणांना सांगली ग्रामीण पाेलिसांनी अटक केली. मंगळवारी रात्री स्वप्नील दशरथ कांबळे (वय २६, रा. कर्नाळ) याचा खून करण्यात आला होता. घरासमोर खाट ठेवल्याचा जाब विचारल्यावरून झालेल्या वादावादीतून ही घटना घडल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

याप्रकरणी मुख्य हल्लेखोर प्रणव ऊर्फ पण्या प्रकाश माने (वय २०, रा. कर्नाळ), साथीदार अनिरुद्ध संजय माने (वय १९), अभिषेक नितीन धोत्रे (१९), प्रीतम ऊर्फ अर्पण राजू सरोदे ऊर्फ धोत्रे (वय १८), गौरव प्रमोद घाडगे (वय २०) आणि रतन ऊर्फ रोहित मोहन वाघमारे (२३, सर्व रा. कुपवाड), अशी त्यांची नावे आहेत.

स्वप्नील कांबळे हा कर्नाळमध्ये राहण्यास होता. मंगळवारी सायंकाळी संशयित प्रणव माने आणि स्वप्नील यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर स्वप्नील सांगलीला येऊन जेवण घेऊन तो घरी परतला होता. कामानिमित्त पावणेनऊच्या सुमारास तो पुन्हा घरातून बाहेर पडला. याचदरम्यान, मावस भाऊ असलेल्या अनिरुद्धला मुख्य संशयिताने बोलावून घेतले होते.

रात्री पावणेनऊच्या सुमारास भोरा म्हसोबा मंदिराजवळ स्वप्नीलला गाठत संशयितांनी वादावादी सुरू केली. यात वाद वाढल्यानंतर संशयितांनी स्वप्नीलच्या छातीवर, डोक्‍यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. तो पडल्यानंतर हल्लेखोर पसार झाले होते. स्वप्नीलला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच स्वप्नीलचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले.

ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवीत सर्व संशयितांना ताब्यात घेतले. यातील दोन अल्पवयीन आहेत. सहा संशयितांना न्यायालयासमोर हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रशांत निशाणदार, पो.कॉ. संदीप मोरे, महेश जाधव, कपिल साळुंखे, सचिन मोरे यांच्या पथकाने संशयितांना जेरबंद केले.

चौकट

खाट ठरली खुनाचे निमित्त

मृत स्वप्नील व मुख्य संशयित प्रणव शेजारी आहेत. घराजवळ असलेल्या रस्त्यावर प्रणवने खाट ठेवली होती. मयत स्वप्नीलची बहीण दुचाकीवरून येताना ही खाट तिला लागली होती. यावरून स्वप्नील व प्रणवमध्ये वाद झाला होता. क्षुल्लक कारणावरून संशयितांनी राग मनात धरून स्वप्नीलचा खून केला.

Web Title: Swapnil's murder after placing a bed in front of the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.