स्वरालीचा मृतदेह ड्रेनेजमध्ये आढळला!

By admin | Published: February 10, 2017 10:47 PM2017-02-10T22:47:00+5:302017-02-10T22:47:00+5:30

बुडून मृत्यू; खेळताना चेंबरमध्ये पडल्याचा कयास; ‘सर्च आॅपरेशन’ थांबले

Swarali's body found in the drainage! | स्वरालीचा मृतदेह ड्रेनेजमध्ये आढळला!

स्वरालीचा मृतदेह ड्रेनेजमध्ये आढळला!

Next



कऱ्हाड : विद्यानगर-सैदापूर येथून संशयास्पदरीत्या बेपत्ता झालेल्या स्वराली वैभव पाटील या चार वर्षांच्या चिमुरडीचा मृतदेह शुक्रवारी सकाळी त्याच अपार्टमेंटच्या ड्रेनेजमध्ये आढळून आला. स्वरालीचा बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक वैद्यकीय अहवाल पोलिसांना मिळाला आहे. तसेच तिच्या शरीरावर कसलेही व्रण नाहीत. त्यामुळे खेळताना ती या ड्रेनेजमध्ये पडली असावी, असा पोलिसांचा कयास आहे.
विद्यानगर-सैदापूर येथील ‘ज्ञानगंगा अपार्टमेंट’मध्ये डॉ. वैभव पाटील हे कुटुंबासह राहण्यास आहेत. बुधवारी दुपारी वैभव यांची चार वर्षांची मुलगी स्वराली अपार्टमेंटखालील वाळूत खेळत बसली होती. मुलगी बाहेर खेळत असल्याने तिची आई घरकामात व्यस्त झाली. घरकाम आटोपल्यानंतर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आईने स्वरालीला हाक मारली. मात्र, कसलाच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे तिने खाली जाऊन पाहिले. त्यावेळी स्वराली परिसरात कोठेच आढळून आली नाही. पाटील कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांनीही स्वरालीचा शोध घेतला. मात्र, ती सापडली नाही. अखेर याबाबतची माहिती कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात देण्यात आली. दरम्यानच्या कालावधीत स्वरालीचे अपहरण झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. त्यानुसार डॉ. वैभव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कऱ्हाड शहर पोलिसांत अज्ञाताविरोधात अपहरणाचा गुन्हा नोंद करून पोलिसांनी स्वरालीचा शोध सुरू केला. बुधवारी रात्री ज्ञानगंगा अपार्टमेंट परिसरात शोध घेण्यात आला. त्यानंतर विद्यानगरसह सैदापूरचे शिवार पोलिसांनी पिंजून काढले. मात्र, कोठेही स्वरालीचा ठावठिकाणा लागला नाही.
दरम्यान, शुक्रवारी सकाळी कऱ्हाड शहर पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने स्वराली जेथून गायब झाली त्याच ठिकाणाहून पुन्हा शोधमोहीम सुरू केली. या पथकातील अधिकारी व कर्मचारी अपार्टमेंटच्या सभोवती शोधत असताना पाठीमागील बाजूस असलेल्या ड्रेनेजच्या चेंबरवरील फरशी सरकल्याचे एका कर्मचाऱ्याला दिसले. कर्मचाऱ्याने डोकावून पाहिले असता ड्रेनेजमध्ये मृतदेह आढळून आला. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्यासह अधिकारी व कर्मचारी त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी परिस्थितीची पाहणी केली. त्यावेळी ड्रेनेजच्या चेंबरवरील फरशी व्यवस्थित नसल्याचे दिसून आले. तसेच ड्रेनेजमधील मृतदेह स्वरालीचा असण्याची दाट शक्यता निर्माण झाली. पोलिसांनी तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्याठिकाणी बोलावून घेतले. मृतदेह ड्रेनेजमधून बाहेर काढला. त्यावेळी तो मृतदेह स्वरालीचाच असल्याचे स्पष्ट झाले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळीच तपासणी केल्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. शवविच्छेदनानंतर तो नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबतची नोंद कऱ्हाड शहर पोलिसांत झाली आहे.
स्वरालीचे अपहरण झाल्याची पोस्ट सोशल मीडियावरून व्हायरल झाल्यानंतर तिला ठिकठिकाणी पाहिल्याची चर्चाही होऊ लागली. त्यामुळे ज्या-ज्या ठिकाणाहून स्वरालीची माहिती मिळत होती तेथे जाऊन पोलिस खात्री करत होते. पाटणमधील एका महिलेने स्वरालीला एसटीमध्ये पाहिल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी पाटणमध्ये जाऊन संबंधित महिलेकडे चौकशी केली. तसेच एसटीच्या वाहकाशीही चर्चा करण्यात आली. मात्र, त्यातून कसलीही ठोस माहिती हाती आली नाही. गुरुवारी रात्रभर जिल्ह्यात ‘सर्च आॅपरेशन’ सुरूच होते.
तिला अखेरचं कोणी पाहिलं?
स्वरालीला अखेरचं कोणी पाहिलं, हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. काहींच्या मते, स्वराली अन्य दोन लहान मुलींसोबत खेळत होती, तर स्वरालीला एकटीला खेळताना पाहिल्याचेही काहींचे म्हणणे आहे. ज्याठिकाणी स्वरालीचा मृतदेह आढळून आला त्या परिसरात ती खेळण्यास जात होती, असे कुटुंबीयांनी सांगितले आहे. त्यामुळे बुधवारी दुपारीही ती खेळत त्या परिसरात गेली असावी व तिचा पाय पडताच फरशी सरकून स्वराली चेंबरमधून ड्रेनेजमध्ये कोसळली असावी, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्तकेली आहे.

Web Title: Swarali's body found in the drainage!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.