जिल्ह्यातील जलतरण, पर्यटन स्थळे खुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:25 AM2020-12-29T04:25:51+5:302020-12-29T04:25:51+5:30
सांगली : राज्य शासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, पर्यटनस्थळे खुली करण्यास प्रशासनाने रविवारी परवानगी दिली. प्रभारी जिल्हाधिकारी ...
सांगली : राज्य शासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, पर्यटनस्थळे खुली करण्यास प्रशासनाने रविवारी परवानगी दिली. प्रभारी जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी हे आदेश जारी केले. कंटोन्मेंट झोनमध्ये मात्र बंदी कायम असल्याचेही त्यांनी सांगितले.
कदम म्हणाले की, शासनाने २१ डिसेंबर रोजी कंटोन्मेंट झोनबाहेरील जलक्रीडा प्रकार, नौका-विहार, मनोरंजन पार्क, पर्यटक स्थळे सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातही ही स्थळे अटी व शर्तीच्या अधीन राहून खुली करण्यास परवानगी देण्यात येत आहे.
कंटोन्मेंट झोनच्या बाहेरील जलक्रीडा प्रकार, नौका-विहार हे सुरू करण्यास परवानगी असेल. याबाबत गृह विभागाकडील मार्गदर्शन सूचना बंधनकारक असतील.
कोविडच्या पार्श्वभूमीवर शारीरिक अंतराचे व संसर्ग न पसरण्याबाबत वेळोवेळी देण्यात आलेल्या निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असेल. या आदेशाची अंमलबजावणी पोलीस अधीक्षक, स्थानिक स्वराज्य संस्था व सर्व संबंधित प्रशासकीय विभाग प्रमुख यांनी करावयाची आहे. या आदेशाचे पालन न करणारी कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे कदम म्हणाले.
चौकट
साडेसहा महिन्यांनंतर स्थळे खुली
कोरोनाचा संसर्ग वाढताच जिल्ह्यात लाॅकडाऊन जाहीर करण्यात आले होते. तेव्हापासून गेले साडेसहा महिने जलतरण, चित्रपटगृहे, मनोरंजन पार्क बंदच होते. आता ती खुली करण्यात येत आहेत. चित्रपटगृहे अजूनही पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाहीत. शहरात केवळ एकच चित्रपटगृह सुरू झाले आहे.