पोहण्याचा तलाव होत्याचा नव्हता झाला

By Admin | Published: March 10, 2016 10:45 PM2016-03-10T22:45:31+5:302016-03-10T23:59:49+5:30

कोट्यवधीचा निधी वाया : इस्लामपूरकरांच्या पोहण्याच्या आनंदावर यावर्षीही विरजण

The swimming pool was not there | पोहण्याचा तलाव होत्याचा नव्हता झाला

पोहण्याचा तलाव होत्याचा नव्हता झाला

googlenewsNext

अशोक पाटील -- इस्लामपूर  -दक्षिणेला लोकनेते राजारामबापू पाटील यांचा पुतळा आणि छोटीशी बाग, पूर्वेला पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांच्या नावाने नवीनच उभी करण्यात आलेली व्यायामशाळा, याच परिसरात योगासाठी उभारलेली इमारत, तसेच उत्तरेस उद्ध्वस्त केलेले अंबाबाई उद्यान, आदी विकास कामांच्या मधोमध बांधण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पोहण्याच्या तलावाची अवस्था आज होत्याची नव्हती झाली आहे. त्यामुळे यावर्षीही इस्लामपूरकरांच्या पोहण्याच्या आनंदावर विरजन पडणार आहे.
इस्लामपूर शहरात प्रवेश करणाऱ्या आष्टा नाका परिसरात पालिकेने विकासावर कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. यापैकी लोकनेते राजारामबापू पाटील यांचा पुतळा आणि छोटीशी बाग वगळता उर्वरित चौक सुशोभिकरण, अंबाबाई उद्यान, आंतरराष्ट्रीय पोहण्याचा तलाव या विकास कामांची वाताहत झाली आहे. अंबाबाई उद्यानासाठी यापूर्वी खर्च केलेले कोट्यवधी रुपये पाण्यात गेले आहेत. आता या बागेच्या नूतनीकरणासाठी पुन्हा कोट्यवधी रुपये खर्च करण्याचा घाट पालिकेने घातला आहे. त्याचठिकाणी असलेला आंतरराष्ट्रीय दर्जाचा पोहण्याचा तलाव उद्ध्वस्त झाला आहे. हा पोहण्याचा तलाव गेल्या १५ वर्षांपासून बंद आहे. यापूर्वी जुजबी दुरुस्ती करुन ठेका पध्दतीने हा तलाव चालविण्याचा प्रयत्न केला. परंतु यामध्ये तोटा होत असल्याने, कोणीही ठेकेदार हा तलाव चालविण्यास पुढे आला नाही. त्यातच या तलावात दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याने, शहरातील पालकांनी आपल्या मुलांना या तलावात पोहण्यासाठी मज्जाव केला. यामुळेच की काय, हा तलाव कायमस्वरुपीच बंद पडला असून त्याचा आता उकिरडा बनला आहे. याठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा परिसर सुशोभिकरणासाठी आलेले कामगार वास्तव्यास आहेत.
या तलावाची दुरवस्था होण्याचे दुसरे एक कारण म्हणजे, पालिका प्रशासनाचा ढिसाळ कारभार. शहराची लोकसंख्या लाखाच्या घरात गेली आहे. या परिसरातील पोहण्यास योग्य असलेल्या विहिरीचे मालक दुर्घटनेच्या भीतीपोटी मुलांना विहिरीत पोहण्यास अटकाव करीत आहेत. तसेच शहरापासून दूर असलेल्या कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी कमालीची घटल्याने, तेथेही पोहण्याचा आनंद लुटता येत नाही. कऱ्हाड, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी अद्ययावत पोहण्याचे तलाव, वॉटर पॉर्क येथे जाणे सर्वसामान्यांना न परवडणारे आहे. त्यामुळे शहरातील जवळजवळ ८0 टक्के मुलांना, पोहतात कसे याचेही ज्ञान नाही.
तत्कालीन नगराध्यक्ष भगवान पाटील यांच्या कारकीर्दीत १ कोटी रुपये खर्च करुन बांधलेल्या तलावाचे उद्घाटन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याहस्ते करण्यात आले होते. त्यावेळीच हा तलाव आंतरराष्ट्रीय दर्जाचा असून येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पोहण्याच्या स्पर्धा होतील, असे जाहीर करण्यात आले होते. परंतु आता हा तलाव आता बेडकांच्या पोहण्याच्या लायकीचाही राहिलेला नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.


शहरातील आंतरराष्ट्रीय दर्जाचा बंद पडलेला पोहण्याचा तलाव उद्घाटन झाल्यापासून कोमात आहे. त्याचा आता उकिरडा झाला आहे. चुकीचे नियोजन यामुळे शासनाने दिलेल्या कोट्यवधी रुपयांचा निधी वाया गेला आहे. हे म्हणजे, एकाच खड्ड्यात दोनदा झाडे लावण्याचा प्रकार आहे. निदान आता तरी चांगल्या दर्जाचे काम करुन खऱ्याअर्थाने आंतरराष्ट्रीय दर्जाचा पोहण्याचा तलाव तयार व्हावा.
- विजय कुंभार, विरोधी पक्षनेते, इस्लामपूर


पालिकेने सादर केलेल्या अर्थसंकल्पात तलाव दुरुस्तीसाठी १ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या उन्हाळ्यात तरी हा तलाव पोहण्यासाठी खुला होणार नाही. पुढीलवर्षी मात्र इस्लामपूरकरांना येथे पोहण्याचा आनंद घेता येणार आहे.
- दीपक झिंजाड, मुख्याधिकारी, इस्लामपूर

Web Title: The swimming pool was not there

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.