वाळव्यात खुनातील संशयितावर तलवार, कोयत्याने वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:27 AM2021-03-05T04:27:31+5:302021-03-05T04:27:31+5:30
आष्टा : वाळवा येथील खून प्रकरणातील संशयित संदेश ऊर्फ साहिल अशोक कदम (वय २५, रा. अहिरवाडी रस्ता, वाळवा) ...
आष्टा : वाळवा येथील खून प्रकरणातील संशयित संदेश ऊर्फ साहिल अशोक कदम (वय २५, रा. अहिरवाडी रस्ता, वाळवा) याच्यावर शिरगाव (ता. वाळवा) येथील सचिन ऊर्फ टायगर चव्हाण व त्याच्या पाच मित्रांनी तलवार, कोयता व चॉपरने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना गुरुवारी दुपारी पावणेबाराच्या दरम्यान घडली.
आष्टा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार २०१९ मध्ये रजनीश ऊर्फ चन्या हणमंत मुळीक याचा संदेश ऊर्फ साहिल अशोक कदम व त्याच्या सहकाऱ्यांनी पूर्ववैमनस्यातून खून केला होता. या खूनप्रकरणी साहिल कदम यास पोलिसांनी अटक केली होती. पाच महिन्यांनंतर तो जामिनावर सुटला होता.
तेव्हापासून रजनीश मुळीकचे भाऊ रोहित मुळीक, संदीप मुळीक, हनुमंत मुळीक, सचिन चव्हाण हे साहिल कदमवर चिडून होते. त्यांच्यात खटके उडत होते.
बुधवारी (दि. ३) सकाळी वाळवा येथील हुतात्मा चौकात सचिन ऊर्फ टारझन चव्हाण याची आकाश अहिर व साहिल कदम यांच्यात वादावादी झाली. मारहाणीच्या भीतीने साहिल कदम शिरगाव येथील मित्र विशाल आनंदा शिंदे याच्या घरी गेला. तेथेच रात्री मुक्काम केला. तो गुरुवारी सकाळी रमेश नाईक याच्या शिरगाव येथील सिद्धेश्वर मंदिरानजीक नदीकाठच्या शेतात मित्र विशाल शिंदे, रोहित पाटील यांच्यासोबत माती काढण्यासाठी गेला होता. तो नदीकाठी असल्याची माहिती मिळताच रोहित मुळीक, सचिन चव्हाण, हनुमंत मुळीक, संदीप सुभाष मुळीक, पप्या चव्हाण व गब्बर ऊर्फ युवराज माने यांनी मोटारसायकलवरून येऊन साहिलला शिवीगाळ सुरू केली. त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व तलवार, कोयता व बारीक चॉपरने सपासप वार केले. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या साहिलवर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्लेखोर फरार झाले आहेत.
साहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव अधिक तपास करीत आहेत. या घटनेने वाळवा परिसरात खळबळ माजली आहे