कडेगावात ताबूतांच्या प्रतीकात्मक भेटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:30 AM2021-08-21T04:30:39+5:302021-08-21T04:30:39+5:30
कडेगाव : हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक व गगनचुंबी ताबूतांसाठी प्रसिद्ध असलेला कडेगाव येथील मोहरम यावर्षीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी साधेपणाने ...
कडेगाव : हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक व गगनचुंबी ताबूतांसाठी प्रसिद्ध असलेला कडेगाव येथील मोहरम यावर्षीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी साधेपणाने साजरा करण्यात आला. ताबूत मिरवणूक व भेटीला फाटा देत साधेपणाने पारंपरिक धार्मिक विधी झाले. सोशल डिस्टन्सिंग ठेवून प्रतीकात्मक भेटी सोहळा झाला.
यावेळी कोरोनाचे संकट दूर हाेण्यासाठी प्रार्थना करण्यात आली. येथील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला मोहरम व त्यानिमित्त उभे केले जाणारे उंच ताबूत प्रसिद्ध आहेत. येथे १४ ताबूत बसवले जातात. त्यापैकी निम्मे हिंदू बांधवांचे असतात. मोहरदिवशी गगनचुंबी ताबूतांची मिरवणूक व भेटी सोहळा होतो. परंतु यंदा कोरोनाच्या संकटामुळे सर्वच धार्मिक कार्यक्रम रद्द केले आहेत. त्यामुळे मोहरमही केवळ धार्मिक विधी करून ताबूतांची उंची कमी करून साधेपणाने साजरा करण्यात आला.
शुक्रवारी सकाळी साडेदहाला पारंपरिक पद्धतीने मानाच्या सातभाई ताबूतजवळ धार्मिक विधी पार पाडण्यात आला. त्यानंतर सातभाई ताबूतचा उत्सुद घेऊन हकीम, बागवान, देशपांडे, शेटे, पाटील, अत्तार, इनामदार, तांबोळी, सुतार, माईनकर, मसूदमातासह सर्व ताबूत व पंजे, बारा इमाम पंजांच्या ठिकाणी धार्मिक विधी पार पाडण्यात आले. सोशल डिस्टन्सिंग ठेवून प्रतीकात्मक भेटी सोहळा झाला.
यावेळी सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम, प्रांताधिकारी गणेश मरकड, तहसीलदार डॉ. शैलजा पाटील, उपविभागीय अधिकारी पोलीस अंकुश इंगळे, राजाराम गरुड आदींनी ताबूतांना भेटी दिल्या. पोलीस निरीक्षक पांडुरंग भोपळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा बंदोबस्त शहरात तैनात करण्यात आला हाेता.