सामान्यांच्या ताटातही आता तूरडाळीचा तडका
By admin | Published: July 29, 2016 11:46 PM2016-07-29T23:46:22+5:302016-07-29T23:50:35+5:30
शासनाचा निर्णय : जिल्ह्यातील ९७ हजार अंत्योदय, बीपीएल कार्डधारकांना मिळणार लाभ
शरद जाधव -- सांगली --सर्वसामान्यांचे जेवणाचे ताट परिपूर्ण करणाऱ्या डाळींच्या किमती वाढतच चालल्याने, त्यांचे बजेट अक्षरश: कोलमडून गेले आहे. डाळींच्या किमती नियंत्रणात ठेवण्यात सरकारला अपयश येत असल्याची तक्रार होत असताना, अखेर शासनाने सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी रास्त भाव दुकानातून तूरडाळीचे वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेतून कमी किमतीत कार्डधारकांना तूरडाळ मिळणार असून जिल्ह्यातील ६१ हजार ६८५ बीपीएल, तर ३५ हजार ९६ अंत्योदय कार्डधारकांना याचा लाभ मिळणार आहे. आॅगस्ट महिन्यासाठी जिल्ह्यासाठी ९६७.८० क्विंटल तूरडाळ उपलब्ध होणार असून या निर्णयामुळे काही प्रमाणात का होईना, तूरडाळीचा ‘तडका’ सर्वसामान्यांना अनुभवता येणार आहे.
चाकरमान्यांचा डबा असो किंवा दैनंदिन आहार, डाळींचा वापर अनिवार्य ठरलेला असतो. मात्र, गेल्या दोन वर्षापासून बाजारात मिळणाऱ्या डाळींच्या किमतीत मोठी वाढ होत आहे. याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य कुटुंबांना बसत असून भाजीपाल्याच्या किमती वाढत चालल्याने डाळींचा पर्यायही त्यांच्या खिशाला चाट मारून जात होता. सरकारकडून डाळींचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी विविध उपाययोजना करूनही बाजारपेठेत दर चढेच राहिल्याने सर्वसामान्यांच्या मासिक बजेटला कात्री लावावी लागत होती. दरम्यान, यामुळे वाढता असंतोष लक्षात घेता, राज्य शासनाने शिधापत्रिकाधारकांना तूरडाळीचे वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राज्य शासनाने ७ हजारावर मेट्रिक टन तूरडाळीची आवश्यकता नोंदविली आहे.
राज्य शासनाच्या या निर्णयाची जिल्ह्यातही अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ६१ हजार ६८५ बीपीएल कार्डधारकांना, तर ३५ हजार ९६ अंत्योदय कार्डधारकांना याचा लाभ होणार आहे. या योजनेतून मिळणारी डाळ अत्यंत कमी प्रमाणात असली तरी, यात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. राज्य शासनाने तीन महिन्यासाठी प्रति शिधापत्रिकाधारकांना एक किलो तूरडाळ वितरणाचे नियोजन केले असून आॅगस्ट महिन्यासाठी ९६७.८ क्विंटल तूरडाळ वितरणाचे नियोजन आहे.
या निर्णयाबरोबरच खुल्या बाजारातील तूरडाळीचे दरही नियंत्रणात आणण्यासाठीचे नियोजन शासनाने केले आहे. त्यानुसार किरकोळ दुकानदार, मॉल, बझार आदी ठिकाणी नियंत्रित दरामध्ये तूरडाळीचे वितरण करण्यात येणार आहे. मात्र, या आदेशातही नियंत्रित दरानुसार प्रति ग्राहकाला केवळ एक किलोच तूरडाळ देण्याचे आदेश देण्यात आल्याने नियंत्रित दरात अधिक प्रमाणात डाळ मिळावी, अशी अपेक्षा सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहे. अशी मागणी असली तरी शासनाच्या या निर्णयाचे जनतेने स्वागत केले आहे.
शिधापत्रिकेवर : जादा तूरडाळ द्या
शासनाच्या या निर्णयानुसार येत्या तीन महिन्यासाठी शिधापत्रिका धारकांना नियंत्रित दराने तूरडाळ देण्यात येणार आहे. मात्र, ही डाळ देताना महिन्याला केवळ एक किलोच देण्याचे आदेश असल्याने एक किलो डाळ महिनाभर पुरणार कशी? असा सवाल आता व्यक्त होऊ लागला आहे. त्यामुळे शासनाने लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या डाळीची मर्यादा वाढविण्याची मागणी आहे. तसेच केवळ तूरडाळच न देता सध्या जादा दराने विकल्या जाणाऱ्या इतर डाळीही रास्त भाव दुकानात उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.