तडवळे ते ईडीआयआय संचालक राजेश्री पाटील यांचा थक्क करणारा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 12:47 AM2019-01-13T00:47:55+5:302019-01-13T00:48:14+5:30
‘स्त्री’ने स्वत:ला ओळखले आणि आपल्यातील सामर्थ्याला सिद्ध केले तर, पदाच्या मागे न धावता पदेच आपल्याकडे धाव घेतात. महाराष्टची लेक स्वत:च्या कर्तबगारीने देशपातळीवर आपल्या पाऊलखुणा उमटवते.
‘स्त्री’ने स्वत:ला ओळखले आणि आपल्यातील सामर्थ्याला सिद्ध केले तर, पदाच्या मागे न धावता पदेच आपल्याकडे धाव घेतात. महाराष्टची लेक स्वत:च्या कर्तबगारीने देशपातळीवर आपल्या पाऊलखुणा उमटवते. ईडीआयआय या देशातील महत्त्वाच्या संस्थेच्या संचालकपदावर निवड झालेल्या राजेश्री आनंद पाटील यांनी युवा पिढीपुढे आदर्श निर्माण केला आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या हस्ते त्यांचा कोकरूड येथे आज, (१३ जानेवारी) रोजी भव्य नागरी सत्कार होत आहे. त्यानिमित्त...
सांगली जिल्ह्यातील शिराळ्यातील दुर्गम असणारे तडवळे हे त्यांचे जन्मगाव. वडील शेतकरी, लहानपणापासून काबाडकष्ट जवळून बघितलेले. चौथीपर्यंत मराठी शाळेत शिक्षण पूर्ण करून माध्यमिक शिक्षण वाणगाव डहाणू येथे पूर्ण करून ११ वी १२ वी वारणानगरला पूर्ण केले. इंजिनिअरिंगची इएनटीसी डिग्री प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झल्यानंतर स्पर्धा परीक्षेची ओढ लागल्याने त्यांनी अभ्यासाला सुरुवात केली. पहिल्या प्रयत्नात एमपीएससीची (महाराष्टÑ लोकसेवा आयोग) पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर युपीएससीसाठी (केंद्रीय लोकसेवा आयोग) दिल्ली गाठली. प्रचंड मेहनत घेऊनही यश सतत हुलकावणी देत होते.
आर्थिक परिस्थिती बेताची असताना आई-वडिलांनी त्यांना प्रोत्साहन दिले. दिल्लीत अभ्यास करताना आर्थिक ओढाताण होत होती. त्यादरम्यान गणित, विज्ञानच्या ट्युशन घेतल्या. युपीएससीचा शेवटचा प्रयत्न झाला आणि त्यांचे आयएएस झालेल्या कोकरूड येथील आनंद पाटील यांच्याशी विवाह झाला. जिल्हाधिकाऱ्याची पत्नी म्हणून स्वत:भोवती कोष न विणता स्वत:चे वेगळेपण त्यांना खुणावत होते. युपीएससीत यश मिळाले नाही तर एमबीए करायचे आधीच ठरवले होते. त्याप्रमाणे इंदिरा गांधी विद्यापीठातून त्यांनी त्यांनी विशेष गुणवत्तेसह एमबीए डिग्री प्राप्त केली.
यावेळी आनंद पाटील तमिळनाडूच्या रामनाथपूरमचे अति. जिल्हाधिकारी होते. तेथे त्यांची भेट माजी राष्टÑपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्याशी झाली. राजेश्री पाटील यांनी तयार केलेल्या सॉफ्टवेअरमुळे दहा हजार लोकांवर डोळे, कान अशा शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या. हे सर्व चालू असतानाच कौटुंबिक सर्व जबाबदाºया त्या लिलया पार पाडत होत्या. त्यांची मोठी मुलगी अभिश्री अन लहान रिद्धीश्री या दोघांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात चमकायला त्या प्रोत्साहन देतात. भरतनाट्यममध्ये अभिश्रीने देशपातळीवर नाव कमावले आहे, तर लहान रिद्धी बॅडमिंटन आणि क्रिकेटमध्ये राज्यस्तरावर चमकत आहे. स्वत:च्या मुलींवर आपली स्वप्ने न लादता त्यांच्या उपजत गुणांना वाव देण्याकडे त्यांचा कल असतो.
हे सर्व करताना राजेश्रीतार्इंनी स्वत:मधले गाणे जपलेय. कर्नाटकी संगीताचेही धडे त्यांनी घेतलेत. अफाट वाचन, स्वत:बद्दल असलेला आत्मविश्वास आणि परिश्रमामुळे त्यांनी स्वत:ला सिद्ध केले आहे. एआयसीटीईची मान्यता असलेल्या व अहमदाबाद येथे मुख्यालय असलेल्या ईडीआयआयच्या संचालक पदावर त्यांची निवड झाली आहे. संपूर्ण जगभरात काम करणाºया या संस्थेत आयएएस दर्जाचे तीन अधिकारी असून, १३ संचालकांमध्ये एकमेव महिला संचालक म्हणून निवड झाली आहे.
ग्रामीण भागात जडणघडण झालेल्या राजेश्रीतार्इंची निवड होणे हे ग्रामीण भागाला भूषणावह आहे. चांगले वाचन करणे, उत्तम दर्जाचे संगीत ऐकणे, निसर्गात मनसोक्त भटकंती करणे, दररोज योगा करणे याबरोबर गोरगरिबांना मदत करणे हा त्यांचा स्थायीभाव आहे. मोठी स्वप्ने पहा आणि स्वत:शी प्रामाणिक रहा, आयुष्य खूप सुंदर आहे, असे त्या तरुणांना सांगतात. त्यांच्या या प्रवासात आई, वडील, सर्व माहेरचे सर्व लोक, पती आनंद पाटील, दुरई अण्णा, सासरची मंडळी, डॉ. एस. एन. पाटील, प्रा. अनिल फाळके यांची प्रेरणा राहिली.
किरण बेदी, पी. टी. उषा, ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना आदर्श मानणाºया या शेतकºयाच्या लेकीने जिल्हाधिकाºयाची पत्नी म्हणून मिरवण्यापेक्षा स्वत:च्या कर्तबगारीने देशपातळीवर स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. माणसाला संपत्तीचा हव्यास नव्हे, तर साहसांचा हव्यास हवा. अशा साहसांना सीमा नसतात. त्यांना फक्त मातीच्या स्पर्शाची अट हवी असते.
संस्थेची वैशिष्ट्ये
उद्योजकता विकास करण्यासाठी काम करणारी संस्था आहे. गुजरातमधील अहमदाबाद येथे २३ एकरात मुख्यालय वसले आहे. एसबीआय, आयडीबीआय, आयसीआयसीआय, आयएफसीआय या बॅँका संलग्न आहेत. परराष्ट मंत्रालयाने ईडीआयआयच्या माध्यमातून उद्योजकता विकास केंद्राची कंबोडीया, लाव्होस, मॅनमार, उजबेकिस्थान या ठिकाणी केंद्रे स्थापन केली आहेत. अशी ५ केंद्रे आफ्रिकन राष्टत सुरू करणे प्रस्तावित आहे.
- बाबासाहेब परीट, बिळाशी.