ताडी-माडीची भेसळ जोमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:26 AM2021-04-16T04:26:56+5:302021-04-16T04:26:56+5:30
कोकरुड : शिराळा, शाहूवाडी तालुक्यात भेसळयुक्त ताडी-माडीची विक्री जोरात सुरू आहे. त्यात नशेच्या गोळ्या, औषधे यांचा वापर मोठ्या प्रमाणात ...
कोकरुड : शिराळा, शाहूवाडी तालुक्यात भेसळयुक्त ताडी-माडीची विक्री जोरात सुरू आहे. त्यात नशेच्या गोळ्या, औषधे यांचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने ग्राहकांच्या जिवाशी खेळ सुरू आहे. यामुळे सांगली व कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यांच्या उत्पादन शुल्क विभागाने लक्ष देण्याची मागणी ग्राहकांतून होत आहे.
ताडी-माडीसाठी शिराळा तालुक्यातील जाधववाडी आणि जानाईवाडी ही दोन महत्त्वाची ठिकाणे आहेत, तर शाहूवाडी (जि. कोल्हापूर) येथील कांडवन गाव आहे. कांडवन हे ताडीचे आगार म्हणून पाहिले जाते. फेब्रुवारी ते जून हा पाच महिन्यांचा ताडी-माडी विक्रीचा व्यवसाय कालावधी असतो. जाधववाडी, जानाईवाडी येथे दररोज चार-पाच शेतकऱ्यांकडून १० ते १५ लिटर ताडी निघत असते, तर कांडवन येथील पाच मांडवामधून अंदाजे ६०० ते ७०० लिटर ताडी निघत असते. मात्र, उत्पन्नापेक्षा जास्त म्हणजे दररोज दहा हजार लिटरची मागणी असल्याने काही व्यावसायिकांकडून यात भेसळ होत आहे. शिळी-ताजी एकत्र करून शंभरपटीने वाढ करणे, लोकांना शुभ्र, ताजी वाटावी यासाठी त्यात चुना, साखर मिसळणे, नशा येण्यासाठी नवसागर, देशी दारू, नशेच्या गोळ्या यांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो.
शिराळा आणि शाहूवाडी तालुक्यांतील काहीजण रत्नागिरी येथील ताडी-माडी आणून कांडवनच्या नावावर खपवत आहेत. ताडी-माडी पिणाऱ्यांमध्ये स्थानिक लोकांची संख्या कमी असली तरी १५ वर्षांवरील युवकांची संख्या जास्त आहे. ताडी-माडी घेण्यासाठी कऱ्हाड, खटाव, सांगली, इस्लामपूर, कोल्हापूर, हातकणंगले, पन्हाळा येथील संख्या मोठी असते.
चाैकट
उलाढाल वाढली
दारूबंदीच्या काळात ताडी-माडीस मागणी जास्त असल्याने मद्यपींची संख्या मोठी असते. अशावेळी शंभर रुपये लिटर असणारी ताडी दीडशे-दोनशेवर जाते. सध्या लॉकडाऊन सुरू असल्याने ताडी-माडीची उलाढाल मोठी सुरू आहे. यामुळे भेसळीचा सुकाळ आला आहे. याकडे उत्पादन शुल्क विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी ग्राहकांतून होत आहे.