दलित महासंघाचा जिल्हाध्यक्ष उत्तम मोहितेसह टोळी तडिपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:33 AM2021-09-08T04:33:01+5:302021-09-08T04:33:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : दलित महासंघाचा जिल्हाध्यक्ष उत्तम जिन्नाप्पा मोहिते (वय ३६, रा. गारपीर चौक) याच्यासह तिघांना मंगळवारी ...

Tadipar with Uttam Mohite, District President of Dalit Federation | दलित महासंघाचा जिल्हाध्यक्ष उत्तम मोहितेसह टोळी तडिपार

दलित महासंघाचा जिल्हाध्यक्ष उत्तम मोहितेसह टोळी तडिपार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : दलित महासंघाचा जिल्हाध्यक्ष उत्तम जिन्नाप्पा मोहिते (वय ३६, रा. गारपीर चौक) याच्यासह तिघांना मंगळवारी एक वर्षासाठी जिल्ह्यातून तडिपार करण्यात आले. पोलीस अधीक्षक दीक्षीत गेडाम यांनी ही कारवाई केली. या टोळीवर अकरा गंभीर गुन्हे दाखल आहेत. तडिपार करण्यात आलेल्या तिघांत दोन महिलांचा समावेश आहे.

उत्तम मोहितेसह ज्योती उत्तम मोहिते (२९, रा. गारपीर चौक, सांगली) व महासंघाची महिला जिल्हाध्यक्ष वनिता वसंत कांबळे (३६, रा. वाल्मिकी आवास) यांचा त्यात समावेश आहे.

उत्तम मोहिते, त्याची पत्नी ज्योती, वनिता कांबळे यांच्याविरुद्ध अपहरण, बलात्कार, मारहाण, सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला, खोटा पुरावा देण्यासाठी धमकी, जबर दुखापत, बेकायदेशीर जमाव जमवून दंगा असे ११ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. सांगली शहर, मिरज शहर, कुपवाड एमआयडीसी, विश्रामबाग पोलिस ठाण्यात हे गुन्हे दाखल आहेत. ही टोळी २०१० पासून कार्यरत आहे. या टोळीची वाढती गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी तडिपारीचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले. त्यानुसार शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अजय सिंदकर यांनी प्रस्ताव सादर केले. त्यानुसार तातडीने मंजुरी देत सांगली जिल्ह्यातून एक वर्षासाठी ही कारवाई करण्यात आली.

अप्पर अधीक्षक मनिषा दुबुले, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड, सहायक निरीक्षक नीलेश बागाव, सहायक फौजदार सिद्धाप्पा रूपनर, दीपक गट्टे, शिवलिंग मगदुम, विजय कारंडे यांचा कारवाईत सहभाग होता.

चौकट

पहिल्यांदाच महिला तडिपार

जिल्ह्यातील अनेक गुन्हेगारी टोळ्यांवर तडिपारीची कारवाई झाली आहे. काही वर्षापूर्वी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका महिलेला तडिपार करण्यात आले होते. त्यानंतर दोन वर्षांत महिला गुन्हेगारांवर तडिपारीची कारवाई झाली नव्हती. आता मोहिते टोळीतील दोन महिलांना तडिपार करण्यात आले.

Web Title: Tadipar with Uttam Mohite, District President of Dalit Federation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.