सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यात आता वाघांची डरकाळी; ताडोबातील ८ वाघ येणार कोयना, चांदोलीत
By संतोष भिसे | Published: October 13, 2023 12:13 PM2023-10-13T12:13:05+5:302023-10-13T12:14:11+5:30
वन विभागाचा प्रस्ताव मंजुरीच्या टप्प्यात
संतोष भिसे
सांगली : विदर्भातील ताडोबा, चंद्रपुरातील वाघ सह्याद्री डोंगररांगात सोडण्यात येणार आहेत. त्याचा प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे चांदोली, कोयनेच्या जंगल प्रक्षेत्रात व कडेकपाऱ्यात आता बिबट्यांच्या जोडीने वाघोबांचाही संचार होणार आहे.
वाघांच्या स्थलांतरासाठी वन विभागाने राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडे परवानगी मागितली आहे. ती लवकरच मिळण्याची शक्यता आहे. चंद्रपूर, ताडोबामध्ये वाघांची संख्या खूपच वाढल्याने जंगलातून लगतच्या निवासी वस्त्यांमध्ये, गावांमध्ये येत आहेत. अन्नासाठी शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांना भक्ष्य करत आहेत. त्यामुळे वाघांची संख्या कमी करण्याचा निर्णय वन मंत्रालयाने घेतला आहे.
त्यानुसार ताडोबातील दोन वाघिणींना नवेगाव-नागझिरा अभयारण्यात सोडण्यात आले. आणखी आठ वाघ सह्याद्रीमध्ये सोडण्यासाठी व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडे परवानगी मागितली आहे. ती लवकरच मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोयना, चांदोलीच्या जंगलात व डोंगररांगात आता वाघांचीही भटकंती आढळणार आहे.
चांदोली, कायनेत सध्या सात वाघ
यावर्षी झालेल्या प्राणी गणनेत कोयना व चांदोलीच्या जंगल परिसरात सात वाघ असल्याचे आढळले आहे. वन विभागाच्या कॅमेऱ्यात त्यांची छबी टिपली गेली असून, वाघांची अधिकृत संख्या जाहीर करण्यात आली आहे. तथापि, हे वाघ स्थायी स्वरूपाचे नाहीत. सह्याद्रीच्या कॅरीडॉरमध्ये फिरत राहणारे आहेत. दांडेली-म्हादई-गोवा-दोडामार्ग-चंदगड-राधानगरी-चांदोली-कोयना हे त्यांचे भ्रमण क्षेत्र आहे.
चांदोलीमध्ये वाघांसाठी वातावरण निर्मिती
सह्याद्रीच्या खोऱ्यात वाघ सोडण्याच्या प्रस्तावानंतर वन विभागाने काही वर्षांपासून तयारी सुरू केली आहे. चांदोलीमध्ये झोळंबी पठारावर सुमारे १० हेक्टर क्षेत्रात गवताळ कुरण विकसित करण्यात आले आहे. तेथे हरण, सांबर, आदी तृणभक्षी प्राण्यांची पैदास सुरू आहे. त्यांची वाढ झाल्यानंतर जंगलात सोडून दिले जाते. या माध्यमातून वाघांसाठी अन्न उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे. वाघ हा गवताळ परिसरात राहणारा व तृणभक्षी प्राण्यांना भक्ष्य करणारा प्राणी असल्याने ही तयारी सुरू आहे.
विदर्भातून सह्याद्री खोऱ्यात वाघांच्या स्थलांतरासाठी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडे प्रस्ताव दिला आहे. त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. मंजुरीसाठीची प्रक्रिया सुरू आहे. - स्नेहलता पाटील, विभागीय वन अधिकारी.