अंकलगीकरांचा पाण्यासाठी टाहो
By admin | Published: April 11, 2017 12:23 AM2017-04-11T00:23:59+5:302017-04-11T00:23:59+5:30
पाण्याची भीषण टंचाई : टँकर मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; पाणी पातळीत घट
गजानन पाटील ल्ल संख
पाणी-पाणीऽऽ असा टाहो फोडत असलेल्या जत तालुक्यातील अंकलगी गावाला शासनानेही वाऱ्यावर सोडल्याचे चित्र आहे. गावात गेल्या दोन महिन्यांपासून पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. ग्रामस्थांना दोन किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. ग्रामपंचायतीने दोन टॅँकरच्या मागणीचा प्रस्ताव देऊनही प्रशासन मूग गिळून गप्प आहे. आसपासच्या ठिकाणचे पाण्याचे स्रोत आटल्याने उन्हातानातून भटकण्याची वेळ आली आहे.
पूर्व भागातील अंकलगी या गावाची लोकसंख्या ३ हजार ६७० आहे. गावासाठी स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजना आहे. गेल्या दोन वर्षापासून पाऊसच झाला नसल्याने तलावही कोरडा पडला आहे. पाण्याअभावी विंधन विहीर कोरडी पडली आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यापासून पाणी पुरवठा बंद आहे. ग्रामस्थांना पाणी मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. यावर्षी परतीच्या मान्सून पावसाने हुलकावणी दिल्याने अपुरा पाऊस झाला आहे. त्यामुळे विहिरी, कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. पाण्याची पातळी ६०० ते ८०० फुटापर्यंत गेली आहे. गावामध्ये १४ हातपंप व विंधन विहिरीतून पाणीपुरवठा सुरु होता. तेही पाण्याअभावी कोरडे पडले आहेत. अंकलगी व परिसरातील वाडी-वस्तीवरही पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत आहे. शाळकरी मुलांना सायकलवरून पाणी आणावे लागत आहे. वयोवृध्दांनाही पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. दिवसातील बराच वेळ पाण्यासाठीच खर्च करावा लागत आहे.
पाणी कुठून मिळवायचे?
अंकलगी गावाचा पाणीप्रश्न सोडविण्याच्या शासनदरबारी कोणत्याही हालचाली दिसत नाहीत. टॅँकरची मागणी करुनही टॅँकरने पाणी देण्यास शासन तयार नाही. पाणी कुठून मिळवायचे? असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. तसेच गावाला टॅँकर सुरु झाला तरी, पाणी कोठून आणायचे? असा प्रश्न पडल्याची माहिती सरपंच सविता तेली यांनी दिली. टॅँकर मागणीचा प्रस्ताव दिल्याचीही माहिती त्यांनी दिली.
तलावाने फिरवली पाठ
गावात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. गावकामगार तलाठी हे गेल्या अनेक दिवसांपासून सात-बारा आॅनलाईन करायचा आहे, म्हणून गावात येत नाहीत. पाणी टंचाईची माहिती प्रशासनाला मिळत नाही. अहवाल पाठविला जात नाही. नागरिकांचा सात-बारा उतारा नोंदी आदी कामेही प्रलंबित आहेत आणि टंचाईबरोबर नागरिकांचे हाल सुरु आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन टॅँकर सुरु करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे.
साठवण तलाव कोरडा
गेल्या चार वर्षापासून पुरेसा पाऊस न झाल्याने साठवण तलाव दोन वर्षापासून कोरडा पडला आहे. तलावातून अनेक गावांना पाणीपुरवठा केला जातो. हा तलाव कोरडा पडल्याने पिके वाळून केली आहेत.