Sangli: ताकारी सिंचन प्रकल्प ४० वर्षांनंतरही अपूर्णच, आतापर्यंत किती कोटी रुपये खर्च झाला..वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 13:58 IST2024-12-18T13:57:35+5:302024-12-18T13:58:01+5:30

दुष्काळी भागासाठी वरदायिनी 

Takari Irrigation Project remains incomplete even after 40 years in Sangli | Sangli: ताकारी सिंचन प्रकल्प ४० वर्षांनंतरही अपूर्णच, आतापर्यंत किती कोटी रुपये खर्च झाला..वाचा

Sangli: ताकारी सिंचन प्रकल्प ४० वर्षांनंतरही अपूर्णच, आतापर्यंत किती कोटी रुपये खर्च झाला..वाचा

प्रताप महाडिक

कडेगाव : सांगली जिल्ह्यातील साटपेवाडी (ता. वाळवा) येथून कृष्णा नदीतील पाणी उचलून घाटमाथ्यावरील २७ हजार ४३० हेक्टर लाभक्षेत्राला पाणी देणारी ताकारी उपसा सिंचन योजना दुष्काळी भागासाठी वरदायिनी आहे. १९८४ ते २०२४ या ४० वर्षांपासून या प्रकल्पाचा प्रवास संघर्षमयी आहे. एक हजार ३२२ कोटींची ही सुधारित पाचव्या प्रकल्पाला मान्यता असूनही आतापर्यंत योजनेसाठी केवळ ९५० कोटी रुपये खर्च झाला. उर्वरित कामे निधीअभावी रखडल्याने प्रकल्प अपूर्णच आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या हस्ते व ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सागरेश्वर खिंडीत या योजनेचे भूमिपूजन २० मे १९८४ रोजी झाले. आता तब्बल ४० वर्षांनंतर राज्यातील महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नव्या मंत्रिमंडळासमोर या योजनेच्या पूर्णत्वाचे आव्हान आहे. प्रारंभीच्या टप्प्यात या योजनेस ८२.४३ कोटी रुपये खर्चाची मान्यता होती. भिलवडी-वांगीचे तत्कालीन आमदार संपतराव चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील आमदारांनी नागपूर अधिवेशनामध्ये ताकारी योजनेचा विषय मांडला. १९८५ मध्ये अपक्ष आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी सत्ताधारी काँग्रेसचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारून योजनेचा पाठपुरावा सुरू केला.

१९८६ मध्ये ८६ कोटींची पहिली सुधारित योजनेला मान्यता मिळाली. १९८८ मध्ये झिरो बजेट धोरणामुळे निधीअभावी योजनेची गती मंदावली. यावेळी आमदार पतंगराव कदम यांनी कडेगावला मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या उपस्थितीत दुष्काळग्रस्तांचा मेळावा बोलविला. या मेळाव्यात शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून मुख्यमंत्र्यांकडून योजनेला पहिल्यांदा निधी मिळाला. तेव्हापासून योजनेचा निधीसाठी आजपर्यंत संघर्ष सुरू आहे.

कृष्णा खोरे महामंडळामुळे योजना मार्गी..

१९९२ मध्ये पतंगराव कदम यांच्याकडे पाटबंधारे खात्याचा कार्यभार आला. त्यावेळी त्यांनी योजनेचा पाठपुरावा केला. १९९५ मध्ये शिवसेना-भाजप युती सरकारला अपक्ष आमदार स्वर्गीय संपतराव देशमुख यांच्यासह जिल्ह्यातील दुष्काळी फोरमच्या अपक्ष आमदारांनी सिंचन योजनांना निधी देण्याच्या अटीवर पाठिंबा दिला. परिणामी, मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी कृष्णा खोरे महामंडळ स्थापन करून योजनांना गती दिली. त्यानंतर आमदार पृथ्वीराज देशमुख यांनीही सिंचन योजनांसाठी पाठपुरावा केला. यावेळी ७ मे १९९७ रोजी ४०२ कोटींच्या दुसऱ्या सुधारित अहवालास मान्यता मिळाली. ९ सप्टेंबर २००० मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते बटण दाबून योजना अंशतः कार्यान्वित केली.

योजनेसाठी ९५० कोटींचा आतापर्यंत खर्च..

२००३ साली ६४६ कोटींच्या तिसऱ्या सुधारित प्रकल्प अहवालास मान्यता मिळाली. १९९९ ते २०१४ या काळात मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या योजनेसाठीच्या आग्रही भूमिकेला मंत्री आर. आर. पाटील यांची साथ लाभली. २०१७ मध्ये भाजप-शिवसेनेच्या युतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात १३०२ कोटींच्या चौथ्या अहवालास मंजुरी दिली. २०१९ मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारमध्ये जलसंपदा मंत्री जयंत पाटील व राज्यमंत्री आमदार विश्वजित कदम यांनीही योजनेच्या कामांना प्राधान्य दिले. २०२२ मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सत्ताकाळात १३२२ कोटींचा पाचवा सुधारित अहवाल मंजूर झाला. या याेजनेसाठी माजी खासदार संजय पाटील यांनी केंद्रस्तरावर पाठपुरावा केला. आजपर्यंत योजनेसाठी ९५० कोटी रुपये खर्च झाले असून उर्वरित कामे रखडलेली आहेत.

असा झाला ताकारी योजनेचा प्रवास..

१९८४ : वसंतदादा पाटील व यशवंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रारंभ
१९८६ : पहिल्या ८६ कोटींच्या सुधारित योजनेला मान्यता
१९९५ : युतीच्या काळात कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना
१९९७ : दुसऱ्या ४०२ कोटींच्या सुधारित अहवालास मान्यता
२००० : विलासराव देशमुख यांच्या हस्ते अंशत: योजना कार्यान्वित
२००३ : तिसऱ्या ६४६ कोटींच्या सुधारित प्रकल्प अहवालास मान्यता
२०१७ : देवेंद्र फडणवीस यांच्या काळात चौथ्या १३०२ कोटींच्या सुधारित अहवालास मान्यता
२०२२ : एकनाथ शिंदे यांच्या काळात १३२२ कोटींचा पाचवा सुधारित अहवालाला मान्यता

Web Title: Takari Irrigation Project remains incomplete even after 40 years in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.